साहित्य माणसाला जगण्याचे बळ देते”- कवी शिवाजी बंडगर

“साहित्य माणसाला जगण्याचे बळ देते”- कवी शिवाजी बंडगर

जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर :-मराठी भाषा गौरवदिनानिमित्त कविता लेखन-सादरीकरण कार्यशाळा उत्साहात; स्पर्धा विजेत्यांचा गौरव
पंढरपूर : रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात पंढरपूर श्रमिक पत्रकार संघ व मराठी विभाग यांच्यामधील सामंजस्य करारांतर्गत मराठी भाषा गौरवदिन व कवी कुसुमाग्रज जयंतीनिमित्त “कविता लेखन आणि सादरीकरण कौशल्य” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात पार पडली. या कार्यक्रमाची सुरुवात कर्मवीर भाऊराव पाटील, रयतमाउली सौ. लक्ष्मीवहिनी व कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करून करण्यात आली. कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक सुप्रसिद्ध ग्रामीण कवी शिवाजी बंडगर होते. यावेळी दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार सतीश बागल तसेच दैनिक लोकमतचे पत्रकार सचिन कांबळे हे ही उपस्थित होते.

कवी शिवाजी बंडगर यांनी आपल्या प्रभावी सादरीकरणातून साहित्याचे जीवनातील महत्त्व अधोरेखित केले. “साहित्य माणसाला जगण्याचे बळ देते; समाजजीवनातील विसंगतींवर भाष्य करताना विनोदाची धारही जपली पाहिजे,” असे ते म्हणाले. त्यांनी गाजराची पुंगी, आमची बि सूनबाई… तशीच आहे!, रितेपोट, माणदेश माझा आहे किती छान, सुगी आदी कवितांचे गायन केले. शेतकरी जीवनातील संघर्ष अधोरेखित करणारी ‘आदलाबदल’ ही कविता तसेच ‘माणदेशातील डाळिंबावर आधारित लावणी’ला श्रोत्यांची विशेष दाद मिळाली. संतपरंपरेतील अभंगांच्या चालीवर विडंबनात्मक काव्य सादर करून त्यांनी सामाजिक प्रश्नांवर भाष्य केले.
यावेळी पत्रकार सतीश बागल यांनी मराठी भाषेच्या संवर्धनात ग्रामीण समाजाचा मोलाचा वाटा असल्याचे नमूद केले. अध्यक्षीय भाषणात उपप्राचार्य डॉ. भगवान नाईकनवरे यांनी मराठी विभागाचा उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगत अनुभवातून उमटलेली कविता विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरते, असे प्रतिपादन केले.
या कार्यशाळेचे प्रास्ताविक समन्वयक डॉ. दत्तात्रय डांगे यांनी केले, तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय कु. मोनिका शिराम यांनी करून दिला. या कार्यक्रमात मराठी विभागातर्फे आयोजित ‘ग्रंथ परीक्षण’ व ‘कविता सादरीकरण’ स्पर्धेतील विजेत्यांचा पेन, पुस्तक व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी स्वायत्त महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. आनंद शिंदे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. अमर कांबळे, ज्युनिअर विभागाचे उपप्राचार्य विठ्ठल काटकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमास सिनियर, ज्युनिअर व व्होकेशनल विभागातील प्राध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच पदवी व पदव्युत्तर मराठी विभागातील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुर्वाक्षी लोंढे यांनी केले, तर आभार कु. धनश्री भोसले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभागप्रमुख डॉ. रमेश शिंदे, प्रा. हरिभजन कांबळे, प्रा. अंकुश घुले, डॉ. बापूसाहेब घोडके, प्रा. सारिका भांगे व प्रा. मोहिनी सावंत, अभिजित जाधव, रामदास भोसले, अमोल माने यांनी विशेष परिश्रम परिश्रम घेतले.



