कोरोनाच्या दहशतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरातच साजरी करावी
सांगली जिल्हाधिकारी, डॉ. अभिजीत चौधरी यांचे आवाहन.
जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
(सांगली जिल्हा प्रतिनिधी/प्रा. डॉ. रामदास नाईकनवरे)
कोरोनाच्या अभूतपूर्व महामारीला रोखण्यासाठी शासनाने लागू केलेल्या ब्रेक द चेनच्या निर्बंधाचे पालन करून भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती प्रतिकात्मक पध्दतीने, साधेपणाने साजरी करावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घरातूनच अभिवादन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती आनंदात साजरी व्हावी. पण कोरोनाची दुसरी लाट अत्यंत गंभीर स्वरूप धारण करत असून कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. हा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कोरोनाची साखळी तोडणे आवश्यक असून, दि. 30 एप्रिल 2021 पर्यंत 5 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येवू नये. यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते रात्रीचे 8 वाजेपर्यंत जमावबंदी आदेश लागू केला आहे. तसेच शुक्रवार रात्री 8 ते सोमवार सकाळी 7 पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्र उभारणीतील योगदान अत्यंत महत्वपूर्ण असून वंचित घटकांच्या उत्थानासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले आहे. या महामानवाच्या विचारांचे, चरित्राचे स्मरण करत असताना आपण सर्वांनीच गर्दी टाळून नियम पाळून शिस्तीचे दर्शन घडवूया, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने राज्य शासनाकडून मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. दरवर्षी 14 एप्रिल या दिवशी डॉ. आंबेडकरांचे अनेक अनुयायी मोठ्या संख्येने जमुन तसेच जयंती दिनाच्या आदल्या दिवशी मध्यरात्री 12 वाजता देखील एकत्र येवून जयंती ठिकठिकाणी साजरी करतात. परंतु यावर्षी कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी अत्यंत साधेपणाने सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजण्यापुर्वी जयंती साजरी करणे अपेक्षित आहे.
दर वर्षीप्रमाणे प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणुका यावेळी काढण्यात येऊ नयेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना त्या ठिकाणी अनुयायांची संख्या एकावेळी 5 पेक्षा जास्त नसावी. तसेच तेथे सोशल डिस्टंन्सींगचे व स्वच्छतेच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे (मास्क, सॅनिटायझर इत्यादी) पालन करून जयंती साजरी करण्यात यावी.
कोविड-19 विषाणुच्या पार्श्वभूमीवर चैत्यभूमी, दादर, मुंबई येथे गर्दी करण्यास निर्बंध असल्याने व दादर, मुंबई तसेच महाराष्ट्रातील अन्य रेल्वे स्थानकावरही गर्दी करण्यास निर्बंध असल्याने शासनातर्फे जयंती निमित्त मुंबई येथील कार्यक्रमाचे दुरदर्शनवरून थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याने सर्व अनुयायींनी चैत्यभुमी, दादर, मुंबई येथे न येता घरातुनच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे.
सार्वजनिक ठिकाणी गाणी, व्याख्याने, पथनाट्य इत्यादीचे सादरीकरण अथवा इतर कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये. त्याऐवजी सदर कार्यक्रमांचे केबल नेटवर्कव्दारे अथवा ऑनलाईन प्रक्षेपण उपलब्ध करून देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी आरोग्यविषयक उपक्रम / शिबिरे (उदा. रक्तदान) स्थानिक प्रशासनाच्या पुर्वानुमतीने आयोजित करता येतील आणि त्याव्दारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करता येईल. तथापि आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करताना त्या ठिकाणी सोशल डिस्टंन्सींग तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.
राज्यातील कोविड-19 विषाणुचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. अशा सूचना राज्य शासनातर्फे देण्यात आल्या असून या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.