‘स्वेरी’ डिप्लोमा मधील ओम हरवाळकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन संस्थेचे सचिव डॉ.बी.पी. रोंगे यांच्या हस्ते संपन्न

छायाचित्र- स्वेरी संचलित डिप्लोमाच्या ओम हरवाळकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करताना स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे सोबत डावीकडून दत्ता कौलवार, डिप्लोमाचे प्राचार्य डॉ.एन.डी.मिसाळ, जगनाथ हरवाळकर, सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे, ओम हरवाळकर, सौ. ललिता हरवाळकर, अथर्व हरवाळकर, शाहूराजे जाधव.
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर:- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित डिप्लोमा इंजिनिअरिंगमधील इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभागाच्या अंतिम वर्षात शिकत असलेल्या ओम जगन्नाथ हरवाळकर लिखित ‘यु कॅन हॅक-अ कंम्प्लिट बिगीनर गाईड ऑन इथिकल हॅकिंग’ या पुस्तकाचे प्रकाशन स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या हस्ते ७३ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने करण्यात आले.
स्वेरी ही शिक्षणसंस्था विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने नेहमीच प्रोत्साहन देण्याचं काम करत असते. याचेच फलित म्हणून डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या ओम हरवाळकर या विद्यार्थ्याने चक्क एक पुस्तक यशस्वीपणे लिहून त्याचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशनही केले. या पुस्तकाचे त्यांनी इंग्रजी भाषेतून लेखन केले आहे. डिप्लोमाला प्रवेश घेतल्यापासून त्यांनी आपण पुस्तक लिहायचे हे फिक्स केले होते. त्या दृष्टीने पाऊल टाकत असताना विद्यार्थ्यांना देखील मार्गदर्शन व्हावे यासाठी या पुस्तकाचे लेखन केले आहे. मागील वर्षी ‘ऑर्गनायझेशन अँड मास्टर इन इथिकल हॅकिंग’ आयोजित ऑनलाईन स्पर्धेमध्ये जगातून सर्व वयोगटातील जवळपास आठ कोटी तर भारतातील पाच लाख स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमधून पहिल्या १० स्पर्धकांमधून ओम याची नवव्या क्रमांकावर निवड झाली होती. सलग ९६ तासांच्या या स्पर्धेत ओम ला एक तास पंचावन्न मिनिटे लागली. या स्पर्धेमध्ये दिलेल्या आकृती मधून गूढ शब्द शोधून काढणे, तसेच विविध संगणक हॅक करणे, डी कोड सेंड करून इथिकल हॅकींग करणे असे विविध टास्क देण्यात आले होते. या मधून ज्यांनी कमी वेळेत हे टास्क पूर्ण केले अशा ५० स्पर्धकांची निवड करण्यात आली. त्या ही स्पर्धेत ओम ने ३४ वा क्रमांक मिळविला होता. आयटी क्षेत्रात आता इथिकल हॅकिंगचे क्षेत्रही मोठं होत आहे. याचा वापर सायबर सेक्युरिटी आणि पोलीस विभागात होतो. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर सिक्युरिटी, आयटी सेल मध्ये नोकरीची संधी उपलब्ध होत आहे. ओम हरवाळकर यांनी मिळवलेलं हे यश कौतुकास्पद तर आहेच पण त्याने आपल्याबरोबर इतर मुलांनाही इथिकल हॅकिंग शिकण्याची इच्छा असणाऱ्या मित्रांना व सहकारी विद्यार्थ्यांना फायदा करून द्यावा यासाठी त्याने हे पुस्तक लिहिले आहे. स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे, डिप्लोमाचे प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ तसेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या विभागप्रमुख प्रा. आर. के. मालगोंडे, कॉम्प्युटर इंजिनिअरींगचे विभागप्रमुख प्रा. अमेय भातलवंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ओम याने हे पुस्तक लेखन पूर्ण केले आहे. ‘ब्ल्यु रोझ पब्लिशर्स’ यांनी हे पुस्तक छापले असून त्यात एकूण २५५ पाने आहेत. हे पुस्तक फ्लीपकार्ट, अॅमेझॉन वर देखील उपलब्ध आहे. लहान वयातच पुस्तक प्रकाशित केल्यामुळे ओमचे सर्वत्र कौतुक होत आहे. पुस्तक प्रकाशनावेळी ओमचे वडील जगनाथ हरवाळकर, ओमची आई सौ. ललिता हरवाळकर, ओमचा भाऊ अथर्व हरवाळकर, दत्ता कौलवार व शाहूराजे जाधव आदी उपस्थित होते. स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी. पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले, संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्त, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज प्रा.एम.एम.पवार, डिप्लोमाचे प्राचार्य डॉ.एन.डी.मिसाळ, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी ओम हरवाळकर चे अभिनंदन केले.





