शिवरायांचे कार्य डोळ्यासमोर ठेवून बाबासाहेबांनी संविधानाची निर्मिती केली:प्रबुद्ध साठे


जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपूर :-छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वसामान्य जनतेचे स्वराज्य निर्माण केले.शिवरायांनी सतराव्या शतकात अठरापगड जातीधर्माच्या मावळ्यांना एकत्रित करुन मोघलाईच्या विरोधात तलवार चालवली,प्रत्येक माणसाला स्वतःचे वाटणारे, सर्वांना समान न्याय देणारे ,लोकशाही प्रधान स्वतंत्र राज्य निर्माण केले.याच शिवरायांच्या ऐतिहासिक कार्याची प्रेरणा घेऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता प्रस्थापित करण्यासाठी, वंचितांना न्याय देण्यासाठी भारतीय संविधानाच्या माध्यमातून प्रजासत्ताक गणराज्य निर्माण केले असे प्रतिपादन प्रसिद्ध विचारवंत प्रबुद्ध साठे यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज जयंती व भारतीय संविधान अमृत महोत्सवानिमित्त पंढरपूर येथे बामसेफ आयोजित व्याख्यानमालेत ‘शिवशाहीपासून लोकशाहीपर्यंत‘या विषयावरती ते बोलत होते.

प्रमुख मार्गदर्शक महाराष्ट्र राज्य मुख्य प्रवक्ता सुनिल अडगळे यांनी सांगितले की, शिवरायांनी तयार केलेले अष्टप्रधान मंडळ बाबासाहेबांना संविधान आणि मंत्रीमंडळ तयार करण्यासाठी उपयोगी ठरले, शिवरायांनी तलवारीच्या धारेवर केलेली क्रांती बाबासाहेबांनी लेखनीच्या माध्यमातून केली.
कार्यक्रमाचे व बामसेफचे राज्याध्यक्ष सचिन भंडारे यांनी बामसेफ समाजोद्धारासाठी सामाजिक उत्तरदायित्वातून काम करत आहे,या कार्याला सर्वानी सहकार्य करावे असे आवाहन करताना वैचारिक प्रबोधनाबरोबर सामाजिक विकासासाठी आम्ही सर्व पदाधिकारी कटीबद्ध आहोत, अशी भावना व्यक्त केली.

यावेळी राज्य कोषाध्यक्ष संजय वनसाळे,उपाध्यक्ष महेश कांबळे, जिल्हा कोषाध्यक्ष शशिकांत कांबळे, तालुका उपाध्यक्ष हरचंद पावरा, चेअरमन नामदेव सरवदे, प्राचार्य भाऊ कांबळे, प्राचार्य राजेंद्र पाराध्ये, लक्ष्मण बंगाळे,व्ही.एस.कांबळे,धनाजी अडगळे आदी मान्यवर उपस्थित होते.महसूल सहाय्य्कपदी निवड झाल्याबद्दल शिलरत्न भोसले(भाळवणी),सहाय्यक अभियंता अनुराधा कसबे(खरसोळी) यांचाही सन्मान करण्यात आला.प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष जालिंदर गायकवाड यांनी केले तर सूत्रसंचालन तालुकाध्यक्ष दत्तात्रय कांबळे यांनी केले.



