Uncategorized

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण

 

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

-श्रीकांत कसबे

पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8.00 वाजता सुरू होणार आहे. यासाठी 14 टेबलवरुन 25 फेऱ्यात मतमोजणी होणार आहे. याकरीता प्रशासनाने आवश्यक ती तयारी पूर्ण केली आहे. मतमोजणीसाठी सुमारे 215 अधिकारी कर्मचारी तर सुरक्षेसाठी 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे यांनी दिली.
पंढरपूर विधानसभा मतदारसंघात एकूण 2 लाख 59 हजार 744 मतदारांनी मतदान केलेले असून, मतदारसंघाची मतमोजणी दि. 23 नोव्हेंबर रोजी शासकीय धान्य गोदाम, रेल्वे मैदान समोर, कराड रोड पंढरपूर येथे होणार आहे. मतमोजणीसाठी 14 टेबल ची संख्या आहे. तर 25 फेऱ्यांतून मतमोजणी पूर्ण होणार आहे. एका टेबलवर एक मतमोजणी पर्यवेक्षक, एक मतमोजणी सहाय्यक, एक शिपाई व एक सूक्ष्म निरीक्षक राहणार आहे. तसेच मतमोजणी कक्षात मतमोजणी अधिकारी, कर्मचारी, निवडणूक निर्णय अधिकारी, निरीक्षक, उमेदवार व निवडणूक मतमोजणी प्रतिनिधी यांच्यासाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मतमोजणीकक्षात पुरेसा वीज पुरवठा व जनरेटर बॅकअप, सीसीटीव्ही यंत्रणा आदी सुविधा असणार आहे. संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेसह आग प्रतिबंधक सुविधा, स्वच्छतागृह, प्राथमिक वैद्यकीय सेवा असणार आहेत.
मतमोजणी केंद्रात निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेल्या अधिकृत पासधारकांसह मतमोजणीसाठी नियुक्त केलेले अधिकारी, कर्मचारी तसेच मोजणी प्रतिनिधी यांनाच प्रवेश दिला जाईल. मतमोजणी कक्षात मोबाईल तसेच आक्षेपार्ह वस्तू नेता येणार नाहीत. तसेच स्वतंत्र माध्यम कक्ष स्थापन करण्यात आला असून त्याद्वारे माध्यम प्रतिनिधींपर्यंत माहिती पोहोचवली जाणार आहे. सुरक्षा व गोपनियतेच्या दृष्टीने विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. मतमोजणीच्या वेळी राजकीय कार्यकर्ते, मतमोजणी प्रतिनिधी यांनी शांतता राखून सहकार्य करावे, असे आवाहनही निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे यांनी केले आहे.
मतमोजणी कक्षात सुरक्षेसाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यामध्ये 12 पोलीस अधिकारी, 125 पोलीस अंमलदार याशिवाय केंद्रीय सुरक्षा बल, एस.आर.पी.एफ. यांची सुरक्षा राहणार आहे. मतमोजणी केंद्रासह मतमोजणी परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. निवडणूक निकालानंतर नागरिकांनी शांतता राखून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे. असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले यांनी केले आहे.
000000

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close