कार्तिकी वारीत वारकऱ्यांची तहान भागवत आहेत स्वेरीचे विद्यार्थी
स्वेरीच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा उपक्रम

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूरः श्री.विठ्ठलाच्या भेटीसाठी आतूर झालेल्या वारकऱ्यांची तहान दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वेरीचे विद्यार्थी भागवीत आहेत. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम.पवार व डिप्लोमाचे प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ यांच्या सहकार्याने डिप्लोमा इंजिनिअरिंगचे विद्यार्थी, विभागप्रमुख आणि प्राध्यापक वर्ग हे पाणी वाटप करत आहेत.
पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षिक एस.जे.सावंत व प्रमुख पाहुणे भीमाशंकर गुरुसिद्धाप्पा सारवाडकर यांच्या हस्ते व रांगेतील वारकरी सौ.संगीता राजू कोळी, मुक्ताई नगर, जळगाव व वारकरी प्रशांत देशमुख, रा.मासाळवाडी, जळगाव यांच्या उपस्थितीत पाणी वाटपाचे उदघाटन करण्यात आले.
या पाणी वाटपाच्या उपक्रमात श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित असलेल्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (डिप्लोमा) महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली विभागप्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थी असे मिळून जवळपास ५० जण पाणी वाटप करत आहेत. राज्यात तंत्रशिक्षणातून विशेष ओळख निर्माण करणाऱ्या ‘स्वेरी’ या संस्थेमार्फत, संस्थेच्या स्थापनेपासून अर्थात १९९८ पासून विविध समाजोपयोगी उपक्रम हाती घेण्यात आलेले आहेत. यंदाच्या कार्तिकी वारीतील वारकऱ्यांचा सहभाग पाहता वारकऱ्यांची गर्दी अधिक होत असल्याचे जाणवत आहे त्यामुळे परंपरेप्रमाणे दर्शन रांगेतील वारकऱ्यांना आर.ओ. फिल्टर्ड पिण्याचे पाणी वाटपाचे कार्य काल नवमी (रविवार, १० नोव्हेंबर) पासून सुरु झाले. वारकऱ्यांच्या उपस्थितीत रिद्धी सिद्धी गणपती मंदिरालगत असणाऱ्या पत्राशेड मधील दर्शन मंडप रांगेतील वारकऱ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी देण्याच्या कार्याला आज दशमीच्या दिवशी अधिक गती आली आहे. सकाळी ८.०० ते सायंकाळी ८.०० या वेळेत गोपाळपूर, रिध्दी-सिध्दी मंदिर व दर्शन बारी, पत्रा शेड या ठिकाणी डिप्लोमाचे विद्यार्थी वारकऱ्यांना प्रचंड उत्साहाने आर.ओ. फिल्टर्ड पाण्याचे वाटप करत आहेत. नवमी, दशमी व एकादशी या तीनही दिवशी विद्यार्थी ग्लास, वॉटर जग आणि वॉटर टॅंकद्वारे पाणी वारकऱ्यांपर्यंत पोहचवून वारकऱ्यांची तहान भागवत आहेत. स्वेरीकडून दररोज साधारण आठ ते दहा हजार लिटर पाण्याचे वाटप केले जात आहे. या उपक्रमाच्या उदघाटनावेळी पोलीस उपनिरीक्षिक एस.जे.सावंत म्हणाले की, ‘स्वेरीचे विद्यार्थी हे अभ्यासक्रमात अग्रेसर आहेतच पण त्यांच्या हातून नेहमीच समाजसेवा उत्तम पद्धतीने घडत आहे’ असे म्हणून स्वेरीच्या समाजकार्याचे कौतुक केले. या कार्यात प्रा. ए.एस.भातलवंडे, प्रा. पी.एस.वलटे, रा.से.योजनेचे प्रा. एन.ए.शिंदे, इतर प्राध्यापक वर्ग व राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थी वारकऱ्यांना पाणी वाटपाचे कार्य मनोभावे करत आहेत. कॉलेजमधून इतर सहकारी पाणी आणून दर्शन रांगेजवळ असलेल्या टाक्यात साठवतात. त्यानंतर विद्यार्थी मोठ्या उत्साहाने वारकऱ्यांना पाणी वाटप करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रत्येक दिवशी जवळपास २० प्राध्यापक व जवळपास ५० विद्यार्थी दिवसभर मोफत शुद्ध पाणी वाटप करत आहेत.