दोन वर्षांपासून रखडलेली रमाई घरकुल योजनेची रक्कम तात्काळ मिळावी
रिपब्लिकन सेनेची पंढरपूर नगरपालिका प्रशासनाकडे मागणी.

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर -( प्रतिनिधी) दोन ते तीन वर्षे उलटूनही पंढरपूर येथील रमाई आवास योजनेतील लाभार्थ्यांना पहिला तर काहींना दुसरा आणि तिसरा हप्ता सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही मिळाला नाही. ही बाब लक्षात घेऊन रमाई आवास योजनेतील लाभार्थ्यांचा रखडलेला निधी तात्काळ देण्यात यावा. अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन पंढरपुरचे मुख्याधिकारी अरविंद माळी यांना देण्यात आले.
यावेळी रिपब्लिकन सेना युवा उपाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र सागर गायकवाड,नगरसेवक लखन चौगुले, सामाजिक कार्यकर्ते संजय बंदपट्टे, दत्ता भोसले उपस्थित होते.
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नागरिकांना आपल्या हक्काचे घर मिळावे यासाठी रमाई आवास योजनेच्या माध्यमातून घरकुल योजना राबवली जात आहे. यासाठी सुमारे अडीच लाख रुपये घरकुलासाठी देण्यात येत आहेत. मात्र पंढरपूर नगरपरिषदेच्या हद्दीतील रमाई आवास योजनेतील लाभार्थ्यांना पहिला हप्ता तर काहींना दुसरा आणि तिसरा हप्ता सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही दोन वर्षे उलटूनही आज तागायत मिळाले नसल्याने रिपब्लिकन सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. यामध्ये रमाई आवास योजनेतील लाभार्थ्यांचा रखडलेला निधी तात्काळ देण्यात यावा. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. यास सर्वस्वी नगरपालिका प्रशासन जबाबदार राहणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.