संविधान मूल्यांचे शिक्षक , प्रशिक्षक आणि संरक्षक आंबेडकरवादी आहेत – अॅड शाम तांगडे

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
अंबाजोगाई : तुम्ही आंबेडकरवादी आहात म्हणून तुम्ही मोठे आहात. इथल्या भांडवलशाहीला व ब्राम्हणशाहीला तुमचे मोठेपण खूपते आहे. कारण तूम्ही या राष्ट्राला मूल्ये देणारे आहात , विनय देणारे आहात ! डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या चळवळीतून राष्ट्राप्रती समर्पणभाव बाळगणारा जनाधार तयार केला. हा प्रशिक्षीत जनाधार त्यांनी २२ प्रतिज्ञा देऊन राष्ट्रनिर्मितीसाठी अर्पण केला. २२ प्रतिज्ञांमुळे आता प्रतिक्रांती शक्य नाही. ब्राम्हणशाहीने पोसलेल्या विकारांवर मात करण्यासाठीचा उपाय धम्म आहे हे त्यांनी जाणले. त्यांनी धम्मक्रांतीच्या माध्यमातून आपल्याला संविधानाशी आणि जगातील मानवतेशी जोडले आहे. म्हणूनच संविधान मूल्यांचे शिक्षक , प्रशिक्षक आणि संरक्षक आंबेडकरवादी आहेत ! असे विचार अॅड शाम तांगडे यांनी व्यक्त केले आहेत. धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनी आयोजित धम्मक्रांती महोत्सव कार्यक्रमात ते अध्यक्ष म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस तथागत बुध्द व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्प तथा पुष्पहार अर्पण करण्यात आला. नंतर सामुहिक वंदना घेण्यात आली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अॅड संदीप थोरात यांनी केले तर संजय हतागळे यांनी आभार व्यक्त केले. या कार्यक्रमास विविध नगरातील नागरिकांची उपस्थिती होती.