अजनसोंड येथे “वर्षावास” कार्यक्रमाचे आयोजन

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
–श्रीकांत कसबे
:पंढरपूर –“वर्षावास हा बौद्ध धम्मातील एक महत्त्वपूर्ण कालावधी आहे. या कालावधीत बौद्ध भिक्षू एकाच ठिकाणी राहून धम्मध्यान, अभ्यास आणि समुदायाशी संवाद साधतात. या कालावधीलाच ‘वर्षावास’ असे म्हणतात. बुद्ध धम्माच्या आचरणाने जीवनातील दुःख नाहीसे होऊन सुख, समाधान आणि शांती प्राप्त होते.” असे विचार पु.भदन्त नागघोष महाथेरो, पुणे यांनी अजनसोंड ता. पंढरपूर येथील बुद्ध विहारात आयोजित ‘वर्षावास’ कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. त्यांनी बुद्ध व बुद्ध धम्म या विषयीही सखोल माहिती सांगितली.
मूळचे अजनसोंड गावचे परंतु सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेले शीलरतन बंगाळे, सविता बंगाळे, शामल जेटीथोर व त्यांचे कुटुंबीय यांनी मे महिन्यात अजनसोंड येथे बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. त्यांच्याच प्रयत्नाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भंतेजी नागघोष यांच्या हस्ते बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून बुद्धवंदना, पंचशील व अष्टांगगाथा घेतल्यावर सभेचे आयोजन करण्यात आले होते.
भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा कोषाध्यक्ष हनमंत बंगाळे यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. याप्रसंगी प्रा. भास्कर बंगाळे यांनी पंचशील व अष्टांगगाथेचे पालन केल्यास आपला निश्चित विकास होतो असे विचार व्यक्त केले. याप्रसंगी शामल जेटीथोर व सविता बंगाळे यांनीही मनोगत व्यक्त केले. मूलं घडविणे ही मातांची आणि कुटुंबीयांची जबाबदारी असते. बुद्ध वंदना, पंचशील, अष्टांगगाथा व इतर पाठांतर स्पर्धा घेऊन मे महिन्यात मुलांना बक्षीसे वाटप करण्यात येतील असे आवाहन त्यांनी केले. भारतीय बौद्ध महासभा पंढरपूर तालुकाध्यक्ष समाधान जाधव व दत्तात्रय सरवदे उपस्थित होते शेवटी भीमशाहीर दत्तात्रय भोसले यांनी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेजर जयद्रथ बंगाळे, लक्ष्मण बंगाळे गुरुजी, नितीन बंगाळे, सचिन मोरे व भीमशक्ती तरुण मंडळाने मोलाचे प्रयत्न केले. अशोक बंगाळे, सोमनाथ बंगाळे, अर्जुन बंगाळे, हनुमंत बंगाळे, सोहेल प्रक्षाळे, स्वप्निल बंगाळे यांचेसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.