माढा आणि सोलापूर लोकसभेच्या भाजपा उमेदवारांचा पराभव करणार!-गणेश अंकुशराव
पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूर दौर्यावर असताना पंढरपुरात आदिवासी कोळी जमात बांधवांचे अन्नपाणी त्याग आंदोलन

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपुर (प्रतिनिधी) : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारी रोजी सोलापूर जिल्ह्याच्या दौर्यावर आलेले असतानाच सोलापूर जिल्ह्यातील आदिवासी महादेव कोळी जमातीचे समाज बांधव अन्नत्याग करणार असल्याचा इशारा महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी दिला होता. त्यानुसार आज पंढरपुरातील महर्षी वाल्मिकी भवन (आदिवासी भवन) येथे आदिवासी कोळी जमात बांधवांनी मोदींचा सोलापुरात दौरा सुरु असतानाच अन्नपाणी त्याग आंदोलन केलं. याचबरोबर सोलापूर जिल्ह्यात अनेक आदिवासी कोळी जमात बांधवांनी आपापल्या घरी अन्नपाणी त्याग आंदोलन केलं असल्याची माहितीही यावेळी गणेश अंकुशराव यांनी दिली. जर आम्हाला वेळीच न्याय मिळाला नाही तर आम्ही आदिवासी जमातीचे मतदार तुमच्या भाजपा व मित्र पक्षाचे सोलापूर आणि माढा लोकसभा मतदार संघातील दोन्ही उमेदवारांचा पराभव करु, कारण आमची मते ही निर्णायक आहेत. अशी प्रतिक्रिया यावेळी गणेश अंकुशराव यांनी दिली आहे.
आदिवासी क्षेत्राच्या बाहेर राहणार्या 45 ते 50 लाख महादेव कोळी जमातीचा जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्राचा प्रश्न गेली अनेक वर्ष रेंगाळला असून लोकशाही मार्गाने अनेक वेळा उपोषण मोर्चे आंदोलन करून सुद्धा राज्य शासनाने न्याय दिला नाही. त्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारीला सोलापूर जिल्ह्याच्या दौर्यावर आले होते. यावेळी नरेंद्र मोदी सोलापूर जिल्ह्यामध्ये थांबले तेवढा वेळ महादेव कोळी जमातीचे बांधवांनी अन्नपाणी न घेता आपल्या व्यथा निदर्शनास आणुन दिल्या.
1956 ला कारण नसताना षडयंत्ररचून कोळी जमातीला क्षेत्र बंधन लागू केले होते. ते क्षेत्रबंधन भारतीय संसदेने 1976 ला उठवले.आहे. त्यामुळे आदिवासी क्षेत्राच्या बाहेरील आदिवासी महादेव कोळी समाज सवलतीस पात्र झाला आहे. परंतु आज पर्यंत ह्या राज्य शासनाने व आदिवासी जमातीच्या 25 आमदार आणि चार खासदारांनी आदिवासी क्षेत्राच्या बाहेरील कोळी जमातीला जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र मिळू दिले नाही. त्यामुळे हा समाज खूप मागे राहिला असून लोकशाही मार्गाने आंदोलन करूनही न्याय मिळत नसल्याने या प्रश्नात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घालावे यासाठी आदिवासी महादेव कोळी जमात बांधवांनी आजचे आंदोलन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेने 1976 ला क्षेत्र बंधन उठवले आहे त्याची अंमलबजावणी राज्य शासनाने आजपर्यंत केलेली नाही त्यामुळे संसदेने केलेल्या कायद्याचा अपमान करणार्या राज्य शासनावरती कठोर कारवाई करावी आदिवासीच्या लोकसंख्येवर निवडून जाणारे आदिवासी 25 आमदार व चार खासदार आदिवासी कोळी जमातीलाच सवलती पासून वंचित ठेवतात त्यामुळे यांना अपात्र करावे व कोळी जमातीच्या जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्राच्या प्रश्नाकडे लक्ष घालून महादेव कोळी जमातीला जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने देण्याचे आदेश द्यावेत व चंद्रभागेतील पात्रात जिथे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेना अटक केली होती त्या जागेवर राष्ट्रीय स्मारक व्हावे मंजूर होऊनही कामाला सुरुवात होत नाही ते काम त्वरित व्हावे अशी मागणी यावेळी समाज बांधवांच्या वतीने महर्षी वाल्मिकी भवन (आदिवासी भवन) पंढरपूर येथे घोषणाबाजी करून करण्यात आली. यावेळी ‘लक्ष द्या! लक्ष द्या मोदी साहेब लक्ष द्या!!, हर हर महादेव! या घोषणांनी परिसर दणाणुुन गेला होता.
यावेळी दादासाहेब करकमकर अशोक अधटराव, सोमनाथ अभंगराव, सुरज कांबळे, विकी अभंगराव, अप्पा करकमकर, अमर संगीतराव, लालू संगीतराव, प्रकाश मगर, माऊली कोळी, रोहन कांबळे, श्रीकांत परचंडे, शुभम ननवरे, संकेत परचंडे, गणेश अभंगराव, अनंत तारापुरकर, चंद्रकांत अभंगराव, राघोजी अभंगराव, राम कांबळे, भैया ननवरे, समाधान कोळी, कृष्णा माने, साहिल माने, शुभम कोताळकर , महादेव शिंदे, अमित जाधव, भैया देशमाने, बंडू माने, सोमनाथ ननवरे, तुषार माने, सचिन साळे, गोविंद करकमकर, ऐदुंबर परचंडे, पांडुरंग कांबळे, भैया नेहतराव, ओंकार अधटराव, दादा माने, उदय परचंडे तसेच असंख्य आदिवासी महादेव कोळी बांधव उपस्थित होते.
………………………………………………………………………………..