करवाढीस स्थगितीस मिळावी अभिजीत पाटील यांनी केली मुख्यमंत्र्यांना विनंती
पंढरपूरचा आवाज थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवला

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
–श्रीकांत कसबे
प्रतिनिधी पंढरपूर/-
दि.१२ : श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी पंढरपूरकराच्या प्रस्तावित जुलमी करवाढीच्या विरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सदरच्या करवाढीस स्थगिती मिळणेकामी पंढरपूरकरांच्या वतीने लेखी पत्राद्वारे निवेदन दिले.
पंढरपूरातील सर्व पक्ष, सर्व संघटना यांनी नगरपरिषदेच्या या जुलमी करवाढीच्या विरोधात मुख्याधिकारी, नगरपरिषद पंढरपूर यांना नागरिकांच्या व्यथा लेखी स्वरूपात मांडून निवेदन देण्यात आले. तसेच पंढरपूरातील सुज्ञ नागरिकांनीही शहराच्या विविध भागामध्ये सह्यांची मोहिम राबवून पंढरपूर नगरपरिषदेने या प्रस्तावित केलेल्या जुलमी करवाढीच्या विरोधात निषेध नोंदविल्याचे दिसून आले.
पंढरपूर नगरपरिषदेने पंढरपूर शहरातील सर्व करपात्र मालमत्ता धारकांसाठी दि.९ नोव्हेंबर, २०२३ रोजी काही वृत्तपत्रांमधून जाहीर प्रसिध्दीकरण देऊन हरकती दाखल करण्याच्या सूचना केलेल्या आहेत. यापूर्वी कोणतीही पूर्व कल्पना न देता अचानकपणे नगरपालिकेकडून मालमत्ता करवाढीची नोटीस पाठविली असल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. पंढरपूर नगरपरिषदेने आरोग्य, पाणी पुरवठा, शिक्षण, स्वच्छता, रस्ते अशा मुलभूत सुविधा नागरिकांना पुरविण्याचे कर्तव्य असताना देखील पंढरपूरातील उपनगरे व अनेक भागामध्ये अशा मुलभूत सुविधा सुरळीत दिलेल्या नाहीत, तरीदेखील आजतागायत नागरिक नगरपरिषदेचा कर भरत आहेत. असे असताना पंढरपूर नगरपरिषदेने चुकीच्या व बेकायदेशीर पध्दतीने कोणताही धोरणात्मक निर्णय न घेता खाजगी कंपनीद्वारे सर्व्हे करून भरमसाठ जुलमी करवाढ प्रस्तावित केलेली आहे. यापूर्वी पाणीपट्टी मध्ये बरीच वाढ केली असून लगेच घरपट्टीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करणे हे नागरिकांवर अन्यायकारक आहे.
सदर करवाढीबाबत श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री अभिजीत आबा पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लेखी निवेदन दिले. यावर सकारात्मक विचार करून लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्री यांनी दिले.