Uncategorized

कार्तिकी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा फडणवीस दापंत्यांच्या हस्ते संपन्न

नाशिक जिल्ह्यातील बबन विठोबा घुगे व सौ. वत्सला बबन घुगे ठरले मानाचे वारकरी

 

 श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व परिवार देवता विकास संवर्धन आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील 26 कोटीच्या कामाचा शुभारंभ

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

-श्रीकांत कसबे

    पंढरपूर, (उ. मा. का.) दि. 23:- बा विठ्ठला… राज्यातील सर्व जनतेला सुखी समाधानी ठेव शेतकरी कष्टकरी समाजासमोरील संकटे दूर करून त्यांना समाधानी ठेव समाजातील सर्व घटकांच्या मनोकामना पूर्ण करण्याची शक्ती व आशीर्वाद द्यावा, असे साकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्तिकी एकादशीनिमित्त आयोजित शासकीय महापुजेच्याप्रसंगी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले.

      महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सौ. अमृता फडणवीस यांच्या हस्ते आज पार पडली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

      यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. तानाजी सावंत, कामगार मंत्री सुरेश खाडे, आमदार सर्वश्री रणजीतसिंह मोहिते पाटील, समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी, राणा जगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, कोल्हापूर पोलीस परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर महाराज, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, उपविभागीय अधिकारी गजानन गुरव व अन्य मान्यवर उपस्थित होते.

        उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, भागवत धर्माची पताका पिढ्यानपिढ्या वारकरी संप्रदाय पुढे घेऊन जात आहे. धर्मावर कितीही आक्रमणे झाली तसेच संकटे समोर आली तरी हा वारकरी संप्रदाय कधीही थांबला नाही, त्यांच्या पावलांनी नेहमीच पंढरीची वाट धरली.  महाराष्ट्र धर्म वारकऱ्यांनी जिवंत ठेवला असून महाराष्ट्र धर्माचा पाया ज्ञानेश्वर माऊलींनी घालून दिला तर संत तुकाराम महाराजांनी त्यावर कळस चढवला. सर्व संतांनी त्यांच्या विचार व आचरणातून सामान्य माणसाला असामान्य बनवले. अनेक पिढ्या बदलल्या परंतु भागवत धर्मावरील लोकांची श्रद्धा बदलली नाही, असे त्यांनी सांगितले.

    मागील वर्षीच्या कार्तिकीला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व परिवार देवता संवर्धनाची संकल्पना मांडली होती, तर या कार्तिकीला मंदिर संवर्धन विकासासाठी मंजूर करण्यात आलेल्या 73 कोटीच्या निधीतून पहिल्या टप्प्यातील 26 कोटीच्या विविध संवर्धन विकास कामांचे भूमिपूजन आज करण्यात आले, त्याबद्दल समाधान वाटत असून हे काम अत्यंत वेगाने व उत्कृष्ट दर्जाचे होईल यासाठी सर्व संबंधित शासकीय यंत्रणा व संबंधित ठेकेदार यांनी काळजी घेतली पाहिजे, असे निर्देश उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी दिले.

    दुसऱ्या टप्प्यातील कामांनाही लवकरच सुरुवात करण्यात येणार असून श्री क्षेत्र पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची कामे सर्वांना सोबत व विश्वासात घेऊन करण्यात येतील. विस्थापित व्हावे लागणार नाही तसेच कोणाचेही नुकसान होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. चंद्रभागा नदी अविरत पणे वाहत राहिली पाहिजे यासाठी नदी संवर्धनाचे सर्व उपाययोजना करण्यात येतील. नदी स्वच्छ राहिली पाहिजे यासाठी नदी पात्रात नदी काठावरील सर्व गावातून येणारे पाणी हे स्वच्छ करूनच नदीत येईल यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत असेही त्यांनी सांगितले.

  यावेळी उपमुख्यमंत्री फडवणीस यांनी कार्तिकी एकादशी निमित्त राज्यातील सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या. तसेच यात्रा कालावधीत जिल्हा प्रशासन व मंदिर समितीने भाविकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या सोयी सुविधा बद्दल त्यांनी कौतुक केले.

मानाचे वारकरी

     कार्तिकी एकादशी यात्रा 2023 निमित्त गुरुवार दिनांक 23 नोव्हेंबर  2023 रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणाऱ्या शासकीय महापूजेच्या वेळी उपस्थित राहणाऱ्या मानाच्या वारकरी निवडीसाठी दर्शन रांगेतून माळकरी भाविकांची निवड करण्यात आलेली आहे.

    नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी तालुक्यातील माळेदुमाला येथील शेतकरी  बबन विठोबा घुगे व सौ. वत्सला बबन घुगे या दांपत्याची मानाचे वारकरी म्हणून निवड करण्यात आलेली आहे. हे शेतकरी दाम्पत्य मागील पंधरा वर्षापासून नियमितपणे वारी करत आहे. या दाम्पत्याला उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्य परिवहन महामंडळाचा वर्षभर मोफत एसटी पास देण्यात आला.

   प्रारंभी मंदिर समितीच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, मानाचे वारकरी व उपस्थित सर्व मान्यवर यांचा सत्कार करण्यात आला.

      मंदिर समितीचे सहअध्यक्ष औसेकर महाराज यांनी प्रास्ताविक केले. कार्तिकी यात्रा निमित्त शासन व प्रशासनाने वारकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा बाबत आभार मानले. श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आषाढीला किमान 12 तास लागत होते तर योग्य नियोजन करून कार्तिकी यात्रेला हा कालावधी आठ ते नऊ तासापर्यंत आलेला आहे अशी माहिती त्यांनी दिली. तसेच मंदिर समितीच्या प्रलंबित प्रश्नाबाबत सहकार्य करावे अशी मागणी त्यांनी केली. मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर महाराज यांनी आभार मानले.

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close