Uncategorized

महाआरोग्य शिबिरासाठी नियुक्त नोडल अधिकाऱ्यांनी त्यांच्या विभागाची जबाबदारी चोख पार पाडावी

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

-श्रीकांत कसबे

पंढरपूर दि. २६ :- आषाढी वारी निमित्त वारकऱ्यांच्या आरोग्य तपासणी साठी पंढरपुरात महाआरोग्य शिबीर होत आहे. या शिबिरासाठी नियुक्त नोडल अधिकारी यांनी त्यांच्या विभागास दिलेली जबाबदारी चोख पार पाडावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय पाटील व महाआरोग्य शिबिराचे नोडल अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदूने यांनी केले आहे.

आषाढी वारी २०२३ मध्ये येणाऱ्या वारकरी भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागामार्फत पंढरपूर येथे वाखरी, ६५ एकर आणि गोपाळपूर या तीन ठिकाणी महाआरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराच्या पार्श्वभूमीवर उप जिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे वॉर रूम कार्यान्वित करण्यात आली आहे.

महाआरोग्य शिबिरात वारकऱ्यांच्या तपासणीस व संदर्भिय सेवेसाठी
राज्यभरातून ३ हजार ६६१ मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले आहे. महाआरोग्य शिबीर २७ ते २९ जून या कालावधीत २४x७ चालू राहणार आहे. महाआरोग्य शिबिरामध्ये १० लाख लोकांची मोफत आरोग्य तपासणी , मोफत औषधोपचार व गंभीर अजाराच्या रुग्णाकरिता महात्मा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत मान्यताप्राप्त रुग्णालयामध्ये संदर्भ सेवा देऊन मोफत उपचार, शास्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.

या बरोबरच तातडीची आरोग्य सेवा देण्यासाठी वाळवंट आणि 65 एकर येथे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना तसेच १० बेड क्षमतेची अतिदक्षता विभागाची सोय केलेली असून मंदिर परिसरामध्ये आरोग्य दूतामार्फत गर्दीच्या ठिकाणी बाईक ॲम्बुलन्स ठेवण्यात आलेले आहेत. अत्यावश्यक सेवेसाठी टोल फ्री क्रमांक 108 च्या 15 रुग्णवाहिका तीन आरोग्य शिबिराच्या ठिकाणी आणि आषाढीवारीसाठी स्वतंत्र 15 रुग्णवाहिका मंदिर परिसरामध्ये प्रशिक्षित मनुष्यबळासह ठेवण्यात आलेल्या आहेत. महाआरोग्य शिबिरासाठी नियुक्त मनुष्यबळाचे प्रशिक्षण व मॉकड्रिल घेण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील व महाआरोग्य शिबिराचे नोडल अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्री. पडदूने यांनी दिली.
०००००

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close