Uncategorized

क्षणभंगूर आयुष्याचा सकारात्मक आस्वाद घेता आला पाहिजे.”  प्रशांतराव परिचारक. 

सामाजिक कार्यकर्ते व कवी रवी वसंत सोनार यांचा ५१ व्या वाढदिवसानिमित्त भव्य सत्कार...

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर (प्रतिनिधी /वार्ताहर /वृत्तसेवा) :- “मानवी आयुष्य हे क्षणभंगूर आहे. उद्याचा काही भरवसा नाही. म्हणूनच अशा क्षणभंगूर आयुष्याचा सकारात्मक आस्वाद घेता आला पाहिजे.” असे मत सोलापूर जिल्ह्याचे मा. आमदार प्रशांतराव परिचारक यांनी व्यक्त केले. ते येथील राणा प्रताप ग्रुप आणि परिवर्तन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने कवी रवि वसंत सोनार यांच्या ५१ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या साहित्यिक, सामाजिक कार्याबद्दल करण्यात आलेल्या सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले “खरंतर रवि सोनार यांच्यासारखा स्वच्छंदी आणि साहित्यिक मित्र असणे हे भाग्य असते. गेल्या काही वर्षात रवि सोनार यांनी केलेले काम इतके मोठे आहे की त्यांची यादी वाचताना सुद्धा दमछाक होते. साहित्य असो, समाजसेवा असो की इतर क्षेत्र रवि सोनार अगदी मोकळेपणाने सर्वत्र वावरत स्वतःही आनंदी राहून आणि समाजालाही आनंद वाटण्याचे काम करत आहे.”
          मा. आमदार प्रशांत परिचारक, उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी मा. गजानन गुरव, सुप्रभात मंडळाचे अध्यक्ष मा. धनाजी देशमुख, पंढरपूर अर्बन बँकेचे चेअरमन मा. सतीश मुळे सत्कारमूर्ती कवी रवि वसंत सोनार व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सविता रवि सोनार आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.  आलेल्या पाहुण्यांचा राणा प्रताप ग्रुप व परिवर्तन ग्रुप यांच्या वतीने स्वागतपर सत्कार करण्यात आला. त्यानंतर साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते रवि वसंत सोनार यांचा ५१ व्या वाढदिवसानिमित्त महावस्त्र, मानाचा फेटा, पुष्पगुच्छ आणि तुळशीहार घालून सपत्नीक सत्कार करण्यात आला.
          रवि वसंत सोनार हे एक प्रसिद्ध साहित्यिक असून त्यांची आजवर वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी तेरा पुस्तके प्रकाशित आहेत. तसेच ते गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नाव नोंदविलेले विक्रमवीर आहेत. साहित्याबरोबरच त्यांचे सामाजिक कार्यही उल्लेखनीय आहे. त्यांनी वयाची पन्नास वर्षे पूर्ण केल्यानंतर वर्षभरात ५१ सामाजिक उपक्रम करून एक वेगळा विक्रम केला आहे. या वर्षभरात नाही रे वर्गासाठी छोटे-मोठे कार्यक्रम घेऊन त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचे काम रवि सोनार यांनी केले आहे. शैक्षणिक, कला, क्रीडा, सामाजिक, साहित्यिक, अध्यात्मिक, सांस्कृतिक असा ५१ उपक्रमांचा संकल्प त्यांनी सोडला होता. परंतु त्यांनी पाहता पाहता वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण असे ५६ उपक्रम पूर्ण केले. निसर्ग संवर्धनासाठी बीज गोळे वाटप तसेच वाचन संस्कृती वाढवण्यासाठी विविध शाळा, ग्रंथालय, वृद्धाश्रम, अनाथाश्रम या व अशा विविध ठिकाणी पुस्तकं भेट देणे, वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना दिवाळीच्या उपयुक्त वस्तू देणे अशा अनेक उपक्रमांनी त्यांनी आपला संकल्प पूर्ण केल्याबद्दल राणा प्रताप ग्रुप व परिवर्तन ग्रुप यांनी त्यांचा ५१ वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला आणि मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सपत्नीक सत्कार केला.
         “कवी रवि सोनार यांच्या सहवासात आले की काहीतरी करण्याची ऊर्जा प्राप्त होते आणि कोणताही भाव न आणता समाजासाठी काही करता येते याची जाणीव होते.” असे उद्गार मा. धनाजी देशमुख यांनी सत्कार सोहळ्यात बोलताना काढले.
          प्रांताधिकारी मा. गजानन गुरव यांनी सांगितले की “कवी रवि सोनार यांच्यासारखी माणसं खूप मोठे काम करत आहेत त्यामुळे त्यांचे कौतुक होणे उचित आहे.”
             “वास्तविक पाहता मी काही फार मोठे काम करत नाही. आपल्याला जे मिळाले ते या समाजातून मिळाले आहे. त्यामुळे त्यातला काही भाग आपण समाजाला परत दिला. ही काही मोठी बाब नाही तर ते कर्तव्यच आहे. आणि मी माझे कर्तव्य करतो. परंतु माझ्या मित्रांनी माझा सत्कार केला. ५१ वा वाढदिवस साजरा केला. यामुळे माझी जबाबदारी आणखीनच वाढली आहे. असे मित्र नशिबाने मिळतात आणि मला ते मिळाले त्यामुळे मी स्वतःला खूप श्रीमंत समजतो.” असे सत्कारमूर्ती रवि वसंत सोनार यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले
          याप्रसंगी उपस्थितांपैकी प्रताप चव्हाण व डॉ. मैत्रेयी केसकर यांनी प्रतिनिधिक स्वरूपात रवि सोनार यांचे बहुरंगी व बहुढंगी कार्यचित्र उपस्थितांसमोर विशद केले. तर आलेल्या मान्यवर पाहुणे व उपस्थित मंडळींनीही रवि सोनार यांचा सत्कार करून त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्ञानेश्वर मोरे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले तर मित्रमंडळी, सगे सोयरे, आप्तेष्ट, स्नेही व नातेवाईक यांच्या उपस्थितीत झालेल्या या सुंदर सोहळ्याचे बहुआयामी व खुमासदार प्रास्ताविक डॉ. सचिन लादे यांनी केले. मंदार केसकर व सचिन कदम यांनी अतिशय सुंदर आणि सुश्राव्य सूत्रसंचालन केले. शेवटी सोमनाथ गायकवाड यांनी पाहुण्यांचे आणि उपस्थितांचे आभार मानले.
             पंढरपूर आणि परिसरातील राजकीय, सामाजिक, आरोग्य, आर्थिक, अध्यात्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, पत्रकारिता, वैद्यकीय, कला व क्रीडा या व इतरही विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालेला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राणा प्रताप ग्रुप आणि परिवर्तन ग्रुपच्या संजय कुलकर्णी, प्रवीण देशपांडे, सुनील जगताप, महेश भोसले, ओंकार कापसे, प्रशांत पाटील, प्रशांत ठाकरे,आनंद नगरकर, कृष्णा सुरशेटवार, तुकाराम खंदाडे, बाळकृष्ण डिंगरे, सचिन लोळगे, माऊली निकते या व इतर अनेक सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close