संत निळोबा महाराज भक्त सदन येथील 137 भाविकांना विषबाधा सर्व भाविकांची प्रकृती स्थिर -प्रांताधिकारी गजानन गुरव

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर दि.(02):- संत निळोबा महाराज सेवा मंडळ त्यागमुर्ती बबन महाराज भक्त सदन,पंढरपूर येथील 137 वारकरी भाविकांना अन्नातून विषबाधा झाल्याने त्यांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. सद्या सर्व भाविकांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिली आहे.
माघी एकादशी निमित्त पंढरपूर येथील सदर मठात नांदेड, हिंगोली, यवतमाळ जिल्ह्यातून वारकरी भाविक आले होते. बुधवार दि. 01 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री 8 ते 9 या कालावधीत एकादशी फराळच्या जेवनात भगर, आमटी व पाणी हे पदार्थ खाल्याने 137 भाविकांना अन्नातून बाधा झाली. त्यांना उलटी, मळमळ, पोटदुखी , चक्कर आदी लक्षणे जाणवल्याने तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार घेत असलेल्या भाविकांची प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी भेट घेवून प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी त्यांच्या समवेत तहसिलदार सुशिल बेल्हेकर, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, मुख्याधिकारी अरविंद माळी, अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त सुनिल जिंतूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बागडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय पाटील, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. महेश माने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ एकनाथ बोधले उपस्थित होते.
संबधित ठिकाणच्या जेवणातील सर्व पदार्थांचे नमुने अन्न व औषध प्रशासन विभागाकडून घेण्यात आले असून, ते नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तात्काळ दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासनाला दिल्याचे प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी सांगितले. तसेच वारी कालावधीत नागरिकांनी व भाविकांनी उघड्यावरील पदार्थ खावू नयेत. मठात, धर्मशाळेत अन्न शिजवताना योग्य पध्दतीने शिजवावे, अन्न स्वच्छ जागेत शिजवावे, स्वच्छ पाण्याचा वापर करावा असे आवाहनही श्री गुरव यांनी केले आहे.
000000000