Uncategorized

मराठी भाषेला ज्ञानेश्वर आणि तुकारामांचे वरदान लाभले आहे – डॉ. बिरा पारसे

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर – “मराठी भाषा ही अभिजात भाषा असून तिला ज्ञानेश्वर आणि तुकारामांच्या अभंगाचे वरदान लाभले आहे. त्यामुळे भाषेवर आलेली आक्रमणे
परतावून लावत भाषा नव्या रुपात दिमाखात वाटचाल करेल. बोली हे भाषेचे मूळ रूप असते तर लेखन हे भाषेचे दुय्यम रूप असते. भाषेच्या अभ्यासकांनी लिखित भाषेच्या अभ्यासापेक्षा बोली भाषा आणि साहित्याच्या अभ्यासास अधिक
प्राधान्य दिले पाहिजे. कोणतीही भाषा शुद्ध किंवा अशुद्ध असत नाही. म्हणून भाषेच्या वापराबाबत लोकांनी संकोच न बाळगता अभिव्यक्त झाले पाहिजे.” असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या मराठी भाषा अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा.डॉ. बिरा पारसे यांनी केले.

रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील
स्वायत्त महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त आयोजित समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे हे होते.प्रा. डॉ. बिरा पारसे पुढे म्हणाले की, “मराठी भाषेचे लिखित प्रारूप तयार करताना अभिजन घटकांनी सांस्कृतिक प्राबल्य निर्माण केले. ग गाईचा , य यज्ञाचा, भ भटजींचा अशा स्वरूपाची अक्षर ओळख निर्माण
करून दिली. भाषा बोलत असताना त्या भाषेत संस्कृती, राहणीमान, भावना, लोकाचार या बाबींचे प्रतिबिंब उमटत असते. व्याकरणाच्या भाषे पेक्षा अंतःकरणाची भाषा ही श्रेष्ठ असते. माणसाचा विकास हा भाषेमुळेच झाला आहे. सध्याचे युग हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे युग असल्याने भाषा आकसत चालली
आहे.”

या कार्यक्रमात सुप्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक डॉ. वामन
जाधव यांचे व्याख्यान झाले. ते आपल्या व्याख्यानात म्हणाले की, “सध्याचे युग बदलत चालले असल्याने भाषेतील अनेक शब्द लोप पावत चालले आहेत. एखादी भाषा मृत होते. तेंव्हा एका संस्कृतीचा खून होत असतो. भाषा ही एकटी येत नसते तर ती सोबत संस्कृती आणि जीवन पद्धती घेवून येत असते. देशी गाईच्या ठिकाणी जर्सी गाई आली. बैलगाडी जावून ट्रक्टर आला. हा बदल हितावह वाटल असला तरी पुरातन कृषी संस्कृती लोप पावत चालली असून तिच्यावर नव्या संस्कृतीचे कलम होत आहे. इतर अनेक भाषेच्या सहवासातून भाषा समृध्द होत असली तरी तिचे मूळ रूप टिकून राहणे आवश्यक आहे.”अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे
म्हणाले की, “अनेक अल्पशिक्षित लोकांनी निर्माण केलेले साहित्य हे दर्जेदार स्वरूपाचे असते. माणसाच्या शरीरात संदेश देणारी एक सांकेतिक प्रणाली असते. तिच्यामुळे शारीरिक चयापचय क्रिया होत असतात. त्याप्रमाणे भाषेच्या बाबतही असते. एखाद्या शब्दाला अधिकचा काना मात्रा दिला तर त्याचा मूळ अर्थ परावर्तीत होतो. त्यामुळे भाषा व्यवस्थित वापरली पाहिजे. भाषेचे सौदर्य आणि अर्थ साहित्यात दडलेले असतात. मराठीतील अनेक साहित्यिकांचे साहित्य खूप दर्जेदार आहे.”

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. चांगदेव कांबळे यांनी केले. तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. राजाराम राठोड यांनी करून दिला. या कार्यक्रमात प्रा. डॉ. राजाराम राठोड व प्रा. डॉ. दत्तात्रय डांगे यांची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या मराठी भाषा अभ्यास मंडळावर कुलगुरू द्वारे नियुक्ती झाल्याबद्दल प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. अमर कांबळे,
सहसमन्वयक डॉ. समाधान माने, प्रा. डॉ. दत्तात्रय डांगे, प्रा. डॉ.
म्हाळाप्पा कांबळे, प्रा. सारिका भांगे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमास पदवी आणि पदव्युत्तर पातळीवरील विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते. शेवटी उपस्थितांचे आभार प्रा. डॉ. रमेश शिंदे यांनी मानले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close