नियोजनपूर्ण अभ्यासाने नेट,सेट परीक्षेत यश मिळवता येते- डॉ. गजानन राशिनकर

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर – “जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यास याच्या बळावर विद्यार्थ्यांना नेट,सेट आणि गेट या परीक्षामध्ये यश संपादन करता येते.पदवी आणि पदव्युत्तर पातळीवरील अभ्यास करणे. चालू घडामोडी अभ्यासणे, शैक्षणिक अध्यापन पद्धती, विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयावर नियोजन पूर्ण अभ्यास केल्यास यश निश्चितपणे सम्पादन करता येते.” असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. गजानन राशिनकर यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील
स्वायत्त महाविद्यालयात नेट-सेट मार्गदर्शन केंद्र आणि इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे हे होते.
डॉ. गजानन राशिनकर पुढे म्हणाले की, “उच्च शिक्षणात
सातत्याने बदल होत आहेत. संशोधन आणि अध्यापन या क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. विद्यापीठे आणि महाविद्यालयात अध्यापन करू
इच्छिणाऱ्यांना या क्षेत्रात खूप श्रम करावे लागतात. बुद्धीचा कस लागतो. आपले ज्ञान आणि माहिती सातत्याने अद्ययावत करावी लागते. वाचन, लेखन, मनन,
चिंतन आणि चर्चा अशा बाबी नित्याने कराव्या लागतात. त्यामुळे नियमित अभ्यासाचा व्यासंग जोपासणे आवश्यक आहे.”
या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ
चंद्रकांत खिलारे म्हणाले की, “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शारीरिक श्रमाबरोबर बौद्धिक श्रमाची सवय असते. शैक्षणिक क्षेत्रात नवीन आव्हाने आली आहेत. ही आव्हाने पेलण्यासाठी शिक्षक आणि प्राध्यापकांना खूप तयारी करावी लागते. विद्यार्थी अवस्थे पासूनच जर अध्ययन आणि अध्यापनाची सवय
करून घेतली तर पुढील आव्हाने सुकर होतात. संशोधन क्षेत्रातील करिअरच्या संधीसाठी खूप संयम आणि निष्ठा याबाबी महत्त्वाच्या आहेत. ”
या कार्यशाळेचे प्रास्ताविक डॉ. उमेश साळुंखे यांनी
केले. या कार्यशाळेसाठी उपप्राचार्य डॉ. बजरंग शितोळे, उपप्राचार्य
अप्पासाहेब पाटील, आय क्यू ए सी चे समन्वयक डॉ. अमर कांबळे, रुसाचे समन्वयक डॉ. चंद्रकांत काळे, डॉ. रविराज कांबळे, प्रा. कल्याण वाटाणे, डॉ. दत्तात्रय चौधरी, डॉ. दत्तात्रय डांगे, प्रा. सुमन केंद्रे, प्रा. जालिंदर वाघ, प्रा. बाळासाहेब गायकवाड, प्रा. संतोष शहाणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या कार्यशाळेत प्रा.आर.एस. शिंदे, प्रा. पी.एस. धारीगौडा यांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले. या कार्यशाळेस एकशे एकोणतीस विद्यार्थी सहभागी होते. शेवटी उपस्थितांचे आभार प्रा. कुबेर गायकवाड यांनी मानले.