आटपाडी येथे फुले शाहू आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान जनजागृती सप्ताह व्याख्यानमालेचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भव्य उद्घाटन…
सात दिवस अनेक विचारवंत वेगवेगळ्या विषयावर करणार प्रबोधन

आटपाडी (डाँ.रामदास नाईकनवरे) आटपाडी येथील राजारामबापू हायस्कूल येथे रविवार दि. 20 नोव्हेंबर रोजी फुले, शाहू, आंबेडकर विचारमंचच्या वतीने चलो संविधान की ओर…… अभियानांतर्गत भारतीय संविधान जनजागृती सप्ताह निमित्त आयोजित केलेल्या 20 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर या सात दिवसाच्या भव्य व्याख्यानमालेचे उद्घाटन उद्या रविवार दि. 20 रोजी महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश (भाऊ) खाडे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमा प्रसंगी विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर व सांगली विधानसभेचे आमदार सुधीर (भाऊ) गाडगीळ, आटपाडी येथील भवानी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन, रावसाहेब (काका) पाटील आणि विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव (दादा) पाटील इत्यादी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष आटपाडी खानापूर विधानसभेचे माजी आमदार राजेंद्र (आण्णा) देशमुख हे असून या सात दिवसाच्या व्याख्यानमालेचे स्वागत अध्यक्ष फुले शाहू आंबेडकर विचार मंचचे अध्यक्ष व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे जिल्हाध्यक्ष मा. राजेंद्र (बापू) खरात हे आहेत.
या व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवसाचे पुष्प नुकतेच मलेशिया येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ अभ्यासक व संशोधक, शिवाजी विद्यापीठाच्या बी. ओ .एस. मराठी मंडळाचे माजी अध्यक्ष, प्रा. डॉ. प्रकाश कुंभार हे “ओबीसी आरक्षण आणि भारतीय संविधान” या विषयाच्या अंगाने गुंफणार आहेत. याच उद्घाटन सोहळ्यामध्ये आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ साहित्यिक, अभ्यासक , व संशोधक , एडवोकेट, डॉ. डी. एस. सावंत यांना समाज भूषण तर सेवानिवृत्त शांतिदूत सुभेदार मेजर महादेव नामदेव शेजाळ यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार येत आहे.
त्यानंतर दि. 21 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर या सात दिवसाच्या कालावधीमध्ये भारतीय संविधानाला केंद्रवरती मानून आपले मोलाचे मार्गदर्शन करण्यासाठी आंबेडकरी चळवतील व विविध क्षेत्रांमध्ये काम करणारे ज्येष्ठ साहित्यिक, अभ्यासक, संशोधक, व विचारवंत इत्यादी मान्यवरांना या व्याख्यानमालेसाठी आमंत्रित केले आहे. त्यामध्ये प्रभाकर निसर्गगंध कोल्हापूर, डॉ. अनंत राऊत नांदेड, प्रा. विक्रांत पाटील तासगाव, प्रबुद्ध परिवाराचे सुनील वाघमारे पंढरपूर, एड. डॉ. सुरेश माने आणि सचिन मोटे इत्यादी अभ्यासक व विचारवंतांचा समावेश आहे.
दि. 26 नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता आटपाडी व आटपाडी तालुका परिसरामधून भव्य संविधान ग्रंथदिंडीचे आयोजन केले आहे. त्याचे उद्घाटन आटपाडीच्या तहसीलदार माने मॅडम यांच्या हस्ते होणार आहे. तरी, तमाम संविधान प्रेमींनी या व्याख्यानमालेचा लाभ घेण्याचे आवाहन फुले शाहू आंबेडकर मंचचे अध्यक्ष व या व्याख्यानमालेचे स्वागत अध्यक्ष राजेंद्र खरात यांनी केले आहे.