संत शिरोमणी नामदेव महाराज जयंती निमित्त पंढरपूर ते घुमान (पंजाब) रथ व सायकल यात्रेचे नियोजन
या रथ व सायकल यात्रेचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ तर पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते समारोप

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर / प्रतिनिधी : संत शिरोमणी श्री नामदेव महाराज जयंती निमित्त श्री क्षेत्र पंढरपूर (महाराष्ट्र) ते श्री क्षेत्र घुमान (पंजाब) या संत नामदेव महाराज रथ व सायकल यात्रेचा शुभारंभ पंढरपूर येथे कार्तिक शुध्द एकादशी शुक्रवार दि. ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तर समारोप सोमवार दि. २८ नोव्हेंबर रोजी पंजाबचे राज्यपाल महामहिम बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते चंदिगड येथील राजभवनात करण्यात येणार असल्याची माहिती भागवत धर्म प्रसारक समितीचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे यांनी दिली.
भागवत धर्म प्रसारक समिती, पालखी सोहळा पत्रकार संघ, नामदेव समाजोन्नती परिषद, श्री नामदेव दरबार कमिटी, घुमान व श्री संत नामदेव शिंपी समाज पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमान ही २३०० किलोमीटरची सायकल यात्रा दि. ४ नोव्हेंबर ते दि. ४ डिसेंबर २०२२ या दरम्यान काढण्यात येणार आहे.
कार्तिक शु || एकादशी संत नामदेव महाराज यांची ७५२ वी जयंती, संत ज्ञानेश्वर माऊलींचा ७२५ वा संजीवन समाधी सोहळा व गुरुनानक जयंती याचे औचित्य साधून संत नामदेव महाराज यांच्या पंढरपूर येथील जन्मस्थानावरुन या यात्रेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. या सायकल यात्रेत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर सायकल रायडिंग केलेल्या वा ५० पेक्षा अधिक वयोमान असलेल्या सुमारे ११० सायकलपटूनी सहभाग नोंदविला आहे. ही रथ व सायकल यात्रा महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, हरियाणा व पंजाब राज्यातून मार्गक्रमण करणार आहे. राष्ट्रीयस्तरावर निघणारी ही पहिली आध्यात्मिक यात्रा असून या यात्रेद्वारे भागवत धर्माच्या शांती, समता आणि बंधूता या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यात येणार आहे.
या पत्रकार परिषदेस संत नामदेव महाराजांचे वंशज ज्ञानेश्वर माऊली नामदास, संत नामदेव शिंपी समाजाचे अध्यक्ष गणेशबापू उंडाळे, उपाध्यक्ष संजय जवंजाळ, विश्वस्त राजेश धोकटे, समितीचे सदस्य सुनील गुरव, गणेश जामदार आदी उपस्थित होते.
# संत शिरोमणी नामदेव महाराज रथामध्ये ५ फुट सुंदर व आकर्षक मूर्ती असणार आहे.
# सायकल यात्रेमध्ये सहभागी यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे .
# दररोज १००km प्रवास करणार आहेत.
# सायकल यात्रेमध्ये सर्वात जास्त वय असणारे वारकरी ८५ वर्षाचे आहेत.
#पंढरपुर सायकल असोसिएशन यांच्या वतीने आयोजित रथ यात्रेचे स्वागत व मदत केली जाणार आहे.
#हि रथ व सायकल यात्रा महाराष्ट्रासह, गुजरात, राजस्थान, हरियाणा व पंजाब राज्यातून मार्गक्रमण करणार आहे.