Uncategorized

भारतीय संस्कृतीचे मूळ प्रयोगरूप लोककलांमधून प्रकटते – प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे

 

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर :-“भारतीय संस्कृती ही लोककलावंतानी जिवंत ठेवली असून लोकसेवा करण्याचे कार्य कलाकार आणि समाजसुधारक करत असतात. भारतीय संस्कृतीचे मूळ हे लोककला आणि प्रयोगरूप लोककलांमध्ये दडलेले असते. लोकसंस्कृती ही लोकांना निखळ आनंद देणारी असते. त्यांच्यामधील मानवी मूल्ये टिकवून ठेवून
निसर्गाच्या अधिक घेवून जाण्याचे कार्य हे लोककला करत असतात. मनोरंजन आणि ज्ञान देण्याचे कार्य सातत्यपूर्ण चालते. म्हणून या लोककला जिवंत आहेत. सध्या प्रसार माध्यमांचे स्वरूप बदलल्याने या लोककलांचे मूळ स्वरूप
टिकवून ठेवणे हे कलावंत समोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. प्रयोगरूप लोककलांमध्ये समाज प्रबोधन करण्याचे मोठे सामर्थ्य आहे. पारंपरिक संहितांच्या स्वरुपात योग्य बदल करून लोककलांचा प्रभाव क्षमतेचा वापर
संविधानिक मूल्यांच्या प्रसारासाठी करावा.”असे प्रतिपादन मुंबई
विद्यापीठातील लोककला अकादमी केंद्राचे प्रमुख प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे यांनी केले.

रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील
स्वायत्त महाविद्यालयात रुसा काम्पोनंट आठ अंतर्गत मराठी विभागाच्या वतीने ‘प्रयोगरूप लोककला : बदलते स्वरूप’ या विषयावर आयोजित करण्यात
आलेल्या एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे, लोकसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. विश्वनाथ शिंदे, रयत शिक्षण संस्थच्या जनरल बॉडीचे सदस्य सुभाषआबा सोनवणे, उपप्राचार्य डॉ. बजरंग शितोळे, उपप्राचार्य डॉ. अप्पासाहेब पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे पुढे म्हणाले की, “सध्या प्रसारमाध्यमे मोठ्या प्रमाणात सक्रीय झाले आहेत. समाज माध्यमातून प्रसिद्धी मिळविण्यासाठी अनेकजण कला सादर करताना दिसतात. प्रसिद्धीसाठी या कलांची तोडफोड करून विकृत स्वरुपात तिचे सादरीकरण केले जाते. कलेचे
मूळ स्वरूप टिकवून ठेवण्यासाठी अस्सल कलाकारांवर अधिकची जबाबदारी आली आहे. कलेतून निखळ आनंद मिळवून देत असताना तिच्या रुपाची अस्सलता टिकवून ठेवणे आवश्यक आहे. कला आणि कलाकार यांच्या प्रति लोकांनी आदर बाळगणे आवश्यक आहे.”

या चर्चासत्राचे बीजभाषण करताना प्रा. डॉ. विश्वनाथ शिंदे म्हणाले की, “देशातील भटक्या विमुक्त जाती जमातीमधील लोकांनी लोककला निर्माण करण्याचे आणि तिचे जतन करण्याचे कार्य केलेले आहे.
निसर्गाविषयीच्या कृतज्ञ भावनेतून अनेक लोककलांचा विकास झाला आहे. या लोककलांच्या प्रयोगामध्ये सातत्याने जरी बदल घडत असले तरी त्याचे मूळ स्वरूप टिकून राहणे आवश्यक असते. लोककलेला लोकांचे अधिष्ठान असते. लोकाश्रयातून या लोककला जिवंत आहेत. चित्रपट, दूरदर्शन वरील मालिका यामधून लोककला सादर होत असताना तिला अधिक ग्रांथिक स्वरूप देण्याचा प्रयत्न केला जातो. ही बाब चुकीची आहे. लोकसाहित्याच्या अभ्यासकांनी
लुप्त होत चाललेल्या लोककला विषयी अभ्यास करून त्यांचे स्वरूप टिकवून ठेवण्यासाठी विशेष परिश्रम घेतले पाहिजेत.”

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे म्हणाले की, “राष्ट्रीय चर्चासत्रातून नवनवीन विषयाचा अभ्यास झाला
पाहिजे. समाजाच्या विकासासाठी हा अभ्यास महत्त्वाचा असतो. लोककला, लोकसाहित्य, लोकसंस्कृती यातून माणसाच्या भौतिक प्रगतीचा मागोवा घेता येतो. ज्ञान आणि मनोरंजन या दोन्ही बाबी समाज हिताच्या असतात. म्हणून त्याची जोपासना झाली पाहिजे. कलावंताच्या कलेची कदर केली जाते. मात्र
कलावंताच्या हिताची काळजी तितकीशी घेतली जात नाही. म्हणून कला आणि कलाकार दोन्हीही जपले पाहिजेत.”

या चर्चासत्राच्या उद्घाटन समारंभाचे प्रास्ताविक, स्वागत प्रमुख पाहुण्यांचा परिचय मराठी विभाग प्रमुख तथा कला विभागाचे
उपप्राचार्य डॉ. चांगदेव कांबळे यांनी केले. तर डॉ. राजाराम राठोड यांनी करून दिला. या कार्यक्रमास शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील डॉ. रणधीर शिंदे, मुंबई विद्यापीठातील डॉ. शिवाजी वाघमारे, राणी चन्नमा विद्यापीठ बेळगाव कर्नाटक येथील डॉ. चंद्रकांत वाघमारे, गोवा विद्यापीठातील डॉ. सुनिता उम्रस्कर, पुणे विद्यापीठातील डॉ. तुकाराम रोंगटे, राजभाषा
संचालनालयातील मराठी अनुवादक अभिषेक राजेंद्र परब आदी मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आदी राज्यातील विविध महाविद्यालयातील मराठी विषयाचे प्राध्यापक, शिक्षक, अभ्यासक, तज्ज्ञ मार्गदर्शक, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.
अमर कांबळे यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार प्रा. डॉ. दत्ता डांगे यांनी मानले.

 

 

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close