Uncategorized
आदिवासी कोळी बांधवांनो 26 ऑगस्ट रोजी पंढरपूरात या ! ‘
शासन आपल्या दारी’ साठी हजर रहाण्याचं गणेश अंकुशराव यांचं आवाहन

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपुर (प्रतिनिधी) : येत्या 26 ऑगस्ट रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सोलापूरचे जिल्हाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ‘शासन आपल्या दारी’ हा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम राबवला जाणार आहे. या उपक्रमाद्वारे शासन जनतेचे प्रश्न थेट ऐकुन ते सोडविण्याच दृष्टीने प्रयत्न करणार आहे. तरी आादिवासी कोळी जमातीच्या जातीच्या दाखल्याच्या रखडलेल्या प्रश्नाला सोडविण्यासाठी सबंध महाराष्ट्रातील आदिवासी कोळी जमातीच्या बंधु भगिणींनी मोठ्या संख्येने पंढरपुरला यावे आणि शासनाला आपल्या जातीच्या दाखल्यासह आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांच्या स्मारकाचा रखडलेला प्रश्न सोडविण्यासाठी लोकशाही मार्गाने विनंती करा. असं आवाहन महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी केले आहे.
आम्ही अनेकवेळा थेट मुख्यमंत्र्यांना आदिवासी कोळी जमातीच्या वरील दोन प्रमुख मागण्यांसह इतर प्रश्न सोडविण्यासाठी निवेदनं दिली, वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनंही केली, परंतु आजतागायत हे प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी शासनाने ठोस कारवाई केलेली नाही. आत्ता वेळ आहे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनाच थेट आपण सर्व समाजाने मिळून निवेदनं देऊन आपल्या मागण्या मान्य करुन घेण्याची. यासाठी तुम्हा सर्व समाज बांधवांनी पंढरपुरात येऊन एकुजुटीने आणि एकमुखाने वरील प्रश्न सोडविण्याची मागणी शासनाला थेट करण्याची! आम्ही जो लढा देतोय तो सत्याचा आहे, आमच्या हक्काचा आहे ही वस्तुस्थिती शासनासमोर आणुन देण्याची हीच ती वेळ आहे. समाजबांधवांनो आत्ता नाही तर कधी नाही!! असे आवाहन गणेश अंकुशराव यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
शासन आपल्या दारी या शासनाच्या उपक्रमात आदिवासी कोळी जमातीचा आवाज बुलंद करण्यासाठी आणि समाजाच्या प्रमुख प्रश्नांना सोडविण्यासाठी आपल्या कायदेशीर कागदपत्रांसह सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे व आपल्या मागण्या सांगाव्यात, असं पुन:श्च आवाहन गणेश अंकुशराव यांनी केले आहे.
