बुध्दीजीवी लोकांनी समाजजागृतीचे काम करणे आवश्यक – प्रा.डॉ. सोमनाथ कदम
कार्यकारी अभियंता मधुसुदन कांडलीकर यांचा निरोप समारंभ संपन्न

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
संपादक-श्रीकांत कसबे
लातूर — भारतातील दलित- उपेक्षित लोक आजही जातीव्यवस्थेत अडकले असून प्रचंड अज्ञान आणि अंध्दश्रद्धेचे शिकार झाले आहेत. त्यामुळे दारीद्रय आणि विवंचनेत ते जीवन व्यतीत करीत आहेत. त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी तसेच त्यांचे आज्ञान घालवून त्यांना स्वावलंबी आणि स्वाभिमानी बनविण्यासाठी समाजातील अधिकारी -कर्मचारी, उच्चशिक्षित बुद्धीजीवी लोकांनी जागृतीची चळवळ अखंडपणे चालविली पाहिजे असे मत सुप्रसिद्ध विचारवंत तथा ‘ लसाकम ‘ चे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. सोमनाथ कदम यांनी मांडले.
लातूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मधुसुदन कांडलीकर यांची जालना येथे बदली झाल्यामुळे ‘ लसाकम ‘ जिल्हाशाखेच्या वतीने प्रबोधन सदनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या निरोप समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. कदम बोलत होते. ते पुढे म्हणाले की, समाजातील डॉक्टर, इंजिनियर, वकील आणि प्राध्यापक अशा उच्चशिक्षित लोकांनी समाजाचे वैचारिक भरण- पोषण करून विवेकवादी समाज बनविला पाहिजे. ही त्यांची सामाजिक आणि नैतिक जबाबदारी आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘ लसाकम ‘ चे माजी प्रांताध्यक्ष बी.बी. गायकवाड होते तर इंजि. नागनाथ कलवले आणि संजय दोरवे यांची प्रमुख उपस्थिती होती. नरसिंग घोडके आणि श्रीमती लक्ष्मी घोडके यांनी इंजि. कांडलीकर यांचा सपत्नीक सत्कार केला. यावेळी अनेकांनी इंजि. कांडलीकर यांच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकणारी भाषणे केली. सत्काराला उत्तर देताना इंजि. कांडलीकर यांनी समाजऋणातून मुक्त होण्यासाठी यथाशक्ती कार्यरत राहू असे अभिवचन दिले.
कार्यक्रमाच्या सुरूवातीस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पाहार घालून अभिवादन करण्यात आले. शिरीष दिवेकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. नरसिंग घोडके यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचलन नारायण कांबळे यांनी केले तर छगन घोडके यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वश्री राजकुमार नामवाड, मधुकर दुवे, राजेंद्र हजारे, राजेश तोगरे, तुळशिराम घोडके, चंद्रकांत घोडके, संग्राम गवाले, श्यामसुंदर चव्हाण, सचिन कांबळे, मानेप्पा कलवले यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास अनेक विद्यार्थी, महिला, पुरूष आणि कार्यकर्ते उपस्थित होते. स्नेहभोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.