निळा झेंडा फडकावून अण्णाभाऊंना अभिवादन करणार. राज्यस्तरीय बैठकीत निर्णय
लसाकम,बीसेफ आणि सत्यशोधक समाज महासंघाचा महत्वपूर्ण निर्णय

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
लातूर – लसाकम,बीसेफ आणि सत्यशोधक समाज महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची एक महत्वपूर्ण राज्यस्तरीय बैठक गुगलमीट वर मा.दिपक साठे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत बहुजन नायक अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमीत्त कोरोनाचे सर्व नियम पाळून दि. 1 ऑगष्ट 2O21 रोजी सकाळी आपापल्या घरी आणि सार्वजनिक ठिकाणी अशोक चक्र असलेला निळा झेंडा फडकावून अण्णाभाऊंना अभिवादन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
‘लसाकम ‘ चे संस्थापक नरसिंग घोडके यांच्या पुढाकाराने ही ऑनलाईन बैठक संपन्न झाली. या बैठकीचे प्रास्ताविक करताना नरसिंग घोडके म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांनी आंबेडकरी विचार समाजात रुजविण्यासाठी आपली वाणी आणि लेखणी झिजविली. सामाजिक आणि आर्थिक समता प्रस्थापित करण्यासाठी आपले आयुष्य समर्पित केले. त्यामुळे अण्णाभाऊंच्या जयंती निमीत्त निळ्या झेंड्याला वंदन करणे अण्णाभाऊंच्या वैचारिक वारसदारांची जबाबदारी आहे. म्हणून भारतामध्ये सर्व शोषित समाजाचे छत्र ठरलेला आणि अखिल मानवजातीला प्रेरणादायी ठरलेला निळा झेंडा फडकावून अण्णाभाऊंची जयंती साजरी करणे आवश्यक आहे. असे म्हटले. म्हणून दि.1 ऑगष्ट 2O21 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात निळा झेंडा फडकावून अण्णाभाऊं साठे यांना अभिवादन करण्याचा कृतीकार्यक्रम ठरविण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगीतले.
या बैठकीत सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी या कृतीकार्यक्रमास पाठिंबा देऊन आपण सहभागी होणार असल्याचे जाहिर केले. यामध्ये दलीत स्वयंसेवक संघाचे रमेश राक्षे, सत्यशोधक समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष डी.एस. नरसिंगे, बीसेफचे राज्याध्यक्ष दत्ता माने, एच.पी. कांबळे, ‘ लसाकम ‘ चे महासचिव राजकुमार नामवाड, प्रा.डॉ. सोमनाथ कदम , प्रा.डॉ. मारोती कसाब, शिरीष दिवेकर, अरूण कांबळे,लक्ष्मण जांभळीकर तसेच सत्यशोधक समाज महासंघाचे राहूल गायकवाड, मंगलताई कांबळे, माणिकराव वाघमारे, छगन घोडके, तुळशिराम घोडके , सत्यशोधक फेडरेशनचे छगन लष्करे आणि अशोक पालके, जे.टी. साळवे, सी.जे. साळवे, प्रकाश गडगेराव, नारायण कांबळे आदी मान्यवरांसह अनेकजण सहभागी झाले होते.
बैठकीचे प्रमुख मार्गदर्शक रमेश राक्षे, डी.एस. नरसिंगे, दत्ता माने आणि अन्य मान्यवरांनी निळ्या झेंड्याचे महत्व सांगून फुले -शाहू -आंबेडकर यांच्या चळवळीचे लाभार्थी असणाऱ्या घटकांनी ती चळवळ गतीमान करणे आवश्यक असल्याचे सांगीतले. अण्णाभाऊंच्या विचाराचा वारसा चालविणाऱ्या संस्था, संघटना आणि व्यक्तीनी निळ्या झेंड्याखाली एकत्र येण्याची गरज असून हा कृतीकार्यक्रम त्याची सुरूवात आहे. असे म्हटले आहे. त्यामुळे दि. 1 ऑगष्ट रोजी प्रत्येकांनी आपापल्या घरावर, वाहनांवर आणि रॅलीमध्ये निळे झेंडे लावावेत. असा ठराव सर्वानुमते 1 करण्यात आला.
या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत केले जात असून बहुजन समाजाला जोडण्यासाठी असे कार्यक्रम घेतले पाहिजेत असे सर्वत्र बोलले जात आहे.