Uncategorized

कर्मवीर’ च्या विनायक नाईकनवरेची दिल्ली एन.सी.सी. परेड मध्ये ‘महाराष्ट्राचा परेड कमांडर’ म्हणून निवड

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर: कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या एन. सी. सी. चा छात्र विनायक नाईकनवरे यास राजपथ, नवी दिल्ली येथे २६ जानेवारी २०२२ रोजी झालेल्या प्रजासत्ताक दिन परेड मध्ये एन. सी. सी. च्या महाराष्ट्र संचालनालयाचे नेतृत्व करण्याचा बहुमान मिळाला. असा मान मिळविणारा तो सोलापूर विद्यापीठच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातील पहिलाच एन.सी.सी. कॅडेट ठरला आहे. कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर आणि एन. सी. सी. विभागासाठी हा अभिमानाचा क्षण असून, रयत शिक्षण संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेल्याची भावना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जे. साळुंखे आणी एन.सी.सी. चे विभाग प्रमुख लेफ्टनंट डॉ. समाधान माने यांनी व्यक्त केली.


महाविद्यालयाच्या एन.सी.सी. विभागात सिनियर अंडर ऑफिसर असलेल्या विनायक नाईकनवरे याची सोलापूर येथे ऑक्टोबर २०२१ मध्ये झालेल्या शिबिरातून पुणे येथील शिबिरासाठी निवड झाली. पुणे एन.सी.सी. मुख्यालय येथे दि. ९ ते २३ ऑक्टोबर दरम्यान विविध स्पर्धामधून केलेल्या नेत्रदीपक कामगिरीमुळे त्याची दिल्ली येथे आयोजित केलेल्या प्रि-आरडीसी (Pre-RDC) साठी निवड झाली आणि १८ नोव्हेंबर २०२१ रोजी तो दिल्ली येथील  कॅम्प मध्ये सहभागी झाला. या कॅम्पमध्ये त्याने सिध्द  केलेल्या नेतृत्वगुणांच्या जोरावर आणी परेड मधील मिळविलेल्या प्राविण्यामुळे त्याची निवड एन.सी.सी. महाराष्ट्र संचालनालयाचे नेतृत्व करण्यासाठी झाली. भारताचे सन्माननीय पंतप्रधान श्री. नरेद्र मोदी याच्या उपस्थितीत पार पडलेल्या संचालनमध्ये त्याने महाराष्ट्राचे नेतृत्व केले. याबद्दल महाविद्यालयाच्या विकास समितीचे अध्यक्ष मा. श्री. संजीवकुमार पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जे. साळुंखे 38 महाराष्ट्र बटालियन सोलापूर चे कमांडिंग ऑफिसर कर्नल राजेश गजराज, प्रशासकीय अधिकारी कर्नल वासुदेवन, महाविद्यालयाचे उप-प्राचार्य डॉ. बी.बी. शितोळे, डॉ. टी.एन. लोखंडे, डॉ. सौ. एल. के. बागल आणी सर्व स्टाफ यांनी अभिनंदन केले.


अगदी हलाखीच्या परिस्थितीतून शिक्षण घेत असलेल्या विनायक नाईकनवरे हा पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोली गावातील असून वडिलांचे काही वर्षापूर्वी निधन झालेले आहे. या सर्व परिस्थितीवर मात करून त्याने हे यश संपादन केल्यामुळे सर्व स्तरातून त्याचे अभिनंदन केले जात आहे.
महाविद्यालयामधील एन.सी.सी विभागात १०७ मुले आणी मुली नियमित प्रशिक्षण घेत आहेत. दरवर्षी विविध राष्ट्रीय शिबिरांमध्ये महाविद्यालयाचे कॅडेट्स सहभागी होऊन विविध स्पर्धामध्ये महाविद्यालयाचे नाव चमकवत असतात. त्याचबरोबर, विद्यार्थ्यांना पोलीस आणि भारतीय सैन्यदलात भरतीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी ‘पोलीस आणि आर्मी भरतीपूर्व मार्गदर्शन केंद्र’ चालविले जाते. महाविद्यालयातील तज्ञ प्राध्यापक मार्फत विद्यार्थ्याच्या लेखी परीक्षेची तयारी या कोर्स मध्ये करून घेतली जाते. शारीरिक परीक्षेच्या तयारीसाठी बाहेरील तज्ञ नेमून प्रशिक्षण दिले जाते. या माध्यमातून गेल्या दोन वर्षात एकूण नऊ विद्यार्थी भारतीय सैन्यात भरती झालेले आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close