स्वेरीत मंगळवार व बुधवार रोजी अवकाश महायात्रेचे आयोजन
विद्यार्थ्यांना स्वेरी कॅम्पस मधून घेता येणार अंतराळाची माहिती
छायाचित्र- इस्त्रो, विज्ञान भारती, स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे डॉ. बी. पी. रोंगे व स्वेरी चिन्ह.
जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर- ‘लक्षावधी किलोमीटर दूर असूनही इथूनच दिसणारे सूर्य, चंद्र, तारे आणि एकूणच अंतराळाचे विद्यार्थ्यांना कायम कुतूहल असते. त्यांची वैज्ञानिक माहिती घेऊन, अंतराळ सफरीचा अनुभव घेण्यासाठी भारतीय अंतराळ संस्थेने (इस्त्रो) मोहीम हाती घेतली आहे. केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या इस्त्रोने अंतराळातील माहितीचे ज्ञान विद्यार्थ्यांना यावे यासाठी एक विशेष बस तयार केली असून, विद्यार्थ्यांना बसच्या माध्यमातून चंद्र, सूर्य, ग्रह, तारे जवळून पाहण्याची अनुभूती घेत अंतराळाची वैज्ञानिक माहिती घेता येणार आहे. ही सुविधा मंगळवार, दि. २४ व बुधवार दि. २५ डिसेंबर, २०२४ या दोन दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत स्वेरी कॅम्पस मध्ये उपलब्ध केली आहे.’ अशी माहिती उपप्राचार्य डॉ.मिनाक्षी पवार यांनी दिली.
स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम पवार यांच्या सहकार्याने, उपप्राचार्य डॉ.मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार, दि. २४ व बुधवार दि. २५ डिसेंबर २०२४ या दोन दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत ‘विज्ञान भारती’ आणि ‘इस्त्रो ‘यांच्या संयुक्त विद्यमाने या अंतरीक्ष महायात्रेचे आयोजन केले आहे. विज्ञान भारतीच्या आखिल भारतीय सदस्य डॉ.मानसी माळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली या बसचे स्वेरी कॅम्पसमध्ये आगमन होणार आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत या बसच्या माध्यमातून अंतराळातील घडामोडींची माहिती व खगोल विज्ञानाची माहिती विद्यार्थ्यांना मिळणार आहे. यातून विज्ञानाची गोडी आणखी वाढणार आहे. ‘या अवकाश महायात्रेमुळे लक्षावधी किलोमीटर दूर असलेले सूर्य, चंद्र, तारे याची माहिती स्वेरी कॅम्पसमधून मिळणार आहे. याचा फायदा सर्व विद्यार्थ्यांना होणार आहे. तरी हा उपक्रम विद्यार्थी, पालकांबरोबरच सर्वांसाठी खुला आहे. तरी परिसरातील सर्व विद्यार्थ्यांनी या माहिती व तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा.’ असे आवाहन उपप्राचार्या डॉ.मिनाक्षी पवार यांनी केले आहे.