Uncategorized

मिनी ऑलिंपिक स्पर्धेत स्वेरीच्या नम्रता घुले यांना तिहेरी गोल्ड मेडल

सोलापूर विद्यापीठातर्फे ‘सेपक टकरा’ या क्रीडा प्रकारात सहभाग

छायाचित्र- नागपूर मध्ये झालेल्या ‘सेपक टकरा’ खेळात स्वेरीच्या नम्रता घुले यांनी तीन सुवर्ण पदक मिळविले त्याबद्दल त्यांचा सत्कार करताना स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे. यावेळी सोबत डावीकडून प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ.सतीश लेंडवे, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपती, ग्रंथपाल वैशाली कदम, दिगंबर घुले व क्रीडा विभागाचे प्रमुख प्रा संजय मोरे.

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर- नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्रीडा संकुल मध्ये झालेल्या मिनी ऑलिंपिक स्पर्धेत ‘सेपक टकरा’ या क्रीडा प्रकाराच्या अंतिम सामन्यात सोलापूरच्या महिला संघाने नाशिक महिला संघाचा पराभव करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. यामध्ये स्वेरीच्या नम्रता दिगंबर घुले यांनी विशेष खेळी साकारत या स्पर्धेत आपली मोहोर उमटवली आणि त्या तीन गोल्ड मेडलच्या मानकरी ठरल्या. या घवघवीत यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शैक्षणिक गुणवत्ता, प्लेसमेंट, वार्षिक परीक्षेचा निकाल आणि प्रवेश संख्या यामध्ये अग्रेसर असलेली ‘स्वेरी’ आता क्रीडा क्षेत्रात देखील महत्वाची भूमिका साकारत आहे. याचेच एक उदाहरण म्हणजे नागपूर मध्ये झालेल्या ‘सेपक टकरा’ या क्रीडा प्रकारामध्ये सोलापूर संघाने अंतिम सामना जिंकला. यामध्ये स्वेरीच्या नम्रता घुले यांची कामगिरी चमकदार राहिली. अंतिम सामन्यात पहिला सेट १५-९ असा जिंकला तर दुसरा सेट १५-१० असा जिंकला. ‘सेपक टकरा’ या मैदानी खेळात डोके व पायाचा वापर करून हा खेळ खेळला जातो. यामध्ये सोलापूरच्या संघाने उपांत्य फेरीत नागपूरला व अंतिम फेरीत नाशिकला नमवून विजेतेपद पटकावत सुवर्णपदक पटकाविले. यामध्ये स्वेरीच्या नम्रता घुले यांना टीम इव्हेंट, रेग्यु व डबल या प्रकारामुळे तिन्हीत गोल्ड मेडल मिळाले. याचबरोबर संघाची कर्णधार कल्याणी बिले, संचिता पवार, प्रणिता लेंडवे, भक्ती घुले व साक्षी शिंदे यांनी देखील उत्कृष्ट खेळाचे दर्शन दिले. सांघिक खेळ करत सोलापूरच्या संघाने पाच गुण मिळवून विजेतेपद मिळवले. नम्रता घुले हया चिचुंबे (ता.पंढरपूर) येथील असून लहानपणापासून खेळाची आवड असून मंगळवेढ्यातील न्यु इंग्लिश स्कुल मध्ये बारावी पर्यंतचे शिक्षण घेऊन पुढे शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने आघाडीवर असलेल्या स्वेरी अभियांत्रिकीच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या विभागात प्रथम वर्षात प्रवेश मिळविला. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम.एम.पवार यांच्या सहकार्याने व क्रीडा विभागाचे प्रमुख प्रा.संजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी या खेळाचा सराव सुरूच ठेवला. खेळात मिळालेल्या प्रोत्साहनामुळे त्यांनी सुवर्णपदकांपर्यंत मजल मारली असून माझ्या यशात गुरुजन वर्गाबरोबरच आई सौ. वंदना, वडील दिगंबर, चुलते सुरेश, काकी सौ. सविता व लहान बहीण भक्ती यांचे ही प्रोत्साहन लाभल्याचे नम्रता यांनी आवर्जून सांगितले. यापूर्वी या संघाला सोलापूर जिल्हा ‘सेपक टकरा’ असोसिएशनचे सचिव रामचंद्र दत्तू, आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षक येताळा भगत, क्रीडा शिक्षक वीरेश अंगडी, क्रीडाशिक्षक आण्णा वाकडे, प्रशांत यादव यांचेही मार्गदर्शन लाभले. ग्रामीण भागात राहून शेतकरी घराण्यात जन्म घेतलेल्या नम्रता यांनी ‘सेपक टकरा’ या क्रीडा विभागात तब्बल २७ सामन्यांमध्ये यश मिळविले आहे. नम्रता या कुरनूर व हैद्राबाद या दोन ठिकाणी झालेल्या राष्ट्रीय सामन्यांमध्ये चमकलेल्या आहेत. सुवर्णपदक मिळविलेल्या नम्रता घुले यांचा संस्थेचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या हस्ते व प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ.सतीश लेंडवे, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपती, ग्रंथपाल वैशाली कदम यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख तसेच संस्थेचे सर्व विश्वस्त व पदाधिकारी, कॅम्पस इन्चार्ज प्रा.एम.एम. पवार, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी नम्रता घुले यांचे अभिनंदन केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close