Uncategorized
१०० कोटींचे विठठल हॅास्पीटल हे विठ्ठल कारखान्याकडे वर्ग करण्याची सभासदांची मागणी

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर(प्रतिनिधी):- श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांच्या ऊसबीलातून रक्कम कपात करुन विठ्ठल हॅास्पीटलची उभारणी झाली असल्याने विठ्ठल हॅास्पीटल हे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडे वर्ग करण्याची मागणी सभासदांमधून होऊ लागली आहे. याचे पडसाद म्हणून राष्ट्रवादीच्या वार्ताफलकावरही हि मागणी झाल्याने पंढरपूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, विठ्ठल साखर कारखाना व विठ्ठल हॅास्पीटलचे संस्थापक आदरणीय कर्मवीर औदुंबरआण्णा पाटील यांनी विठ्ठल कारखान्याच्या सभासदांच्या ऊसबीलातून रक्कम वजा करुन पंढरपूर येथे सभासदांच्या आरोग्याची मोफत काळजी घेण्यासाठी विठ्ठल हॅास्पीटलची उभारणी केलेली आहे. मात्र औदुंबरआण्णांच्या या उदात्त व दुरदृष्टीच्या धोरणाचा विसर पडल्याने, विठ्ठल हॅास्पीटलचा फायदा विठ्ठल साखर कारखान्याच्या सभासदांना वा त्यांच्या कुटुंबियांना झाला नसल्याने विठ्ठल कारखान्याच्या सभासदांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. म्हणूनच राष्ट्रवादीच्या कार्यालयात विठ्ठल कारखान्याच्या सभासदांनी स्वयंखुद्द बैठक घेऊन विठ्ठल हॅास्पीटल हे विठ्ठल कारखान्याकडे वर्ग केल्याशिवाय विठ्ठलच्या सभासदांना विठ्ठल हॅास्पीटलचा लाभ मिळणार नाही, असे स्पष्ट मत सभासदांनी व्यक्त केले आहे. तसेच विठ्ठल हॅास्पीटलची स्थावर जंगम मालमत्ता हि अंदाजे १०० कोटींची आहे. या हॅास्पीटलने बांधलेल्या व्यापारी संकुलातसुद्धा एकही गाळा विठ्ठल कारखान्याच्या सभासदाला दिलेला नाही. सध्या विठ्ठल हॅास्पीटल हे खाजगी मालकीचे असल्याप्रमाणे वापरले जात आहे, हि खेदाची बाब असल्याचे मत सभासदांनी व्यक्त केले आहे.
सभासदांच्या स्वयंखुद्द बैठकीला अनेक सभासद स्वयंखुद्द हजर असल्याचे पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले, संदीप मांडवे,कलावती म्हमाने च्या वतिने सूहास म्हमाने,दत्तात्रय कांबळे,किसन कांबळे,जाबवंत कांबळे,वासूदेव काबळे,हेमंत भोसले, विठ्ठलभाऊ रोंगे,बाळासाहेब यलमारपाटील आदि अनेक सभासद मान्यवरांनी मान्य केले.