Uncategorized

सेवाभावाच्या भावनेने कर्तव्य बजावावे — ना. प्रा. डॉ. तानाजीराव सावंत  

महाआरोग्य शिबिराच्या तयारीचा घेतला आढावा महाआरोग्य शिबिरातून वारकरी संप्रदायाचे आरोग्य जपण्याचे काम

 

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर, दि. २३ (उ. मा. का.)-  वारकरी संप्रदायाचे आरोग्य जपण्याचे काम आषाढी वारी कालावधीत पंढरपूर येथे आयोजित महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे या शिबिरासाठी नियुक्त केलेल्या प्रत्येकानेच सर्वश्रेष्ठ सेवाभावाच्या भावनेने आपले कर्तव्य बजावावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. ड़ॉ. तानाजी सावंत यांनी आज येथे केले.

आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमिवर वारकरी भाविकांचे आरोग्य जपण्यासाठी आरोग्य विभागातर्फे दि. २७ ते २९ जून दरम्यान पंढरपूर येथे तीन ठिकाणी महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात येत आहे. या महाआरोग्य शिबिराच्या नियोजन आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस दूरदृष्यप्रणालीद्वारे आरोग्य विभागाचे अतिरीक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आयुक्त, आरोग्य सेवा डॉ. धीरजकुमार तर शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, संचालक, आरोग्य सेवा डॉ. स्वप्नील लाळे, नोडल अधिकारी सदाशिव पडदुने, आरोग्य उपसंचालक डॉ. राधाकृष्ण पवार, भैरवनाथ साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रा. शिवाजी सावंत यांच्यासह जिल्ह्यातील विविध प्रशासकीय अधिकारी, ५ विभागातील आरोग्य उपसंचालक, विविध जिल्ह्यातील जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आदि उपस्थित होते.

 ‘आरोग्याची वारी पंढरीच्या दारी’ह्या संकल्पनेवर आधारित वारी कालावधीतील हे महाआरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी शिस्तबद्ध व सूक्ष्म नियोजन करून परस्पर समन्वय ठेवावा. हे महाशिबिर यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभागासह संबंधित सर्व यंत्रणांनी परिपूर्ण प्रयत्न करावेत, असे निर्देश यावेळी प्रा. ड़ॉ. तानाजी सावंत यांनी दिले.

ते म्हणाले, तीन रस्ता, गोपाळपूर, वाखरी या तीन ठिकाणी हे महाशिबिर होणार आहे. यासाठी स्वतंत्र वॉर रूम कार्यान्वित यावी व त्या अनुषंगाने तांत्रिक बाबींसह आवश्यक सर्व यंत्रणा सुसज्ज ठेवाव्यात. महाशिबिरासाठी नाशिक, कोल्हापूर, पुणेसह विविध आरोग्य मंडळातील अधिकारी, कर्मचारी, सहाय्यक यांच्या सेवा घेण्यात येत आहेत. त्यासाठी शिबिरनिहाय पुरेसे मनुष्यबळ, आवश्यक औषधसाठा व यंत्रसामुग्री, तयार ठेवावी. पालखी प्रस्थान ते पालखी प्रवास या दरम्यान ऑक्सिजन, रक्तसाठा, सुसज्ज १०८ रूग्णवाहिकेसह बाईक अँब्युलन्स सुस्थितीत उपलब्ध ठेवाव्यात. यामध्ये कसलीही तडजोड करू नये, असे त्यांनी स्पष्ट केले.

प्रा. ड़ॉ. तानाजी सावंत म्हणाले, चंद्रभागेच्या दोन्ही तीरावरही १० खाटांचे तात्पुरत्या स्वरूपात दवाखाने कार्यरत ठेवावे. महाशिबिरांच्या ठिकाणी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांसह अग्निशमन यंत्रणा, फिरते शौचालय, फिजिओथेरपी यंत्रणा आदि सोयी सुविधा उपलब्ध ठेवाव्यात. महावितरणाने शिबिराच्या ठिकाणी सुरक्षित व अखंडित वीजपुरवठा करावा. वारकरी भाविकांसाठी वाळवंटात स्वच्छ व मुबलक पेयजल पुरवठा करावा.

 महाआरोग्य शिबिरासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी सोपवलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. तसेच, पंढरपूर शहर व परिसरातील सर्व खाजगी दवाखान्यांनीही २४ तास सेवा द्यावी. आरोग्यदूतांनीही योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.यावेळी आरोग्य विभागाच्या वतीने केलेल्या तयारीचे सादरीकरण डॉ. राधाकृष्ण पवार यांनी केले.

दरम्यान, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. ड़ॉ. तानाजी सावंत यांनी महाशिबिरांच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन प्रशासनाने केलेल्या नियोजनाची व सोयीसुविधांची पाहणी केली व संबंधितांना आवश्यक त्या सूचना केल्या.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close